एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओने (Reliance Jio) 5G सेवा सुरू केली आहे. परंतु, अनेक ग्राहकांना ही सेवा वापरता येणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, डिसेंबरपर्यंत Apple आणि Samsung मोबाईल फोनवर 5G सपोर्ट उपलब्ध असेल. म्हणजेच अॅपल आणि सॅमसंगच्या 5G फोन युझर्सना 5G साठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आता सॅमसंगनंदेखील याची माहिती दिली आहे. कंपनी टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत काम करत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या 5G डिव्हाईससाठी ओटीए अपडेट नोव्हेंबर 2022 च्या मध्यापर्यंत मिळणार आहे. या ओटीए अपडेटनंतरच ग्राहकांना 5G सेवांचा वापर करता येणार आहे. यापूर्वी त्यांच्या मोबाइलमध्ये 5G सेवा येणार नाही.
ठराविक शहरांमध्ये सेवा
दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्यानंतरही सॅमसंग फोन युझर्सना सेवांचा वापर करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. हळूहळू अनेक मोबाइल कंपन्या यासाठी अपडेट देणार आहे. सध्या काही ठराविक शहरांमध्ये एअरटेल आणि जिओनं 5G सेवांची सुरूवात केली आहे. सध्या चाचणीच्या स्वरुपात या सेवांचा वापर करता येत आहे.
एअरटेल युझर्सना 4G प्लॅनवरच 5G सेवा वापरता येणार आहे. तर जिओ युझर्सना बिटा टेस्टिंगमध्ये अनलिमिटेड इंटरनेट देत आहे. पुढील वर्षापर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवांचा लाभ घेता येणार आहे. याचाच अर्थ 5G सेवांसाठी आता ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे. ॲपलच्या ग्राहकांनाही आयफोनमध्ये 5G सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. अद्याप कंपनीनं याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.