Samsung CEO Hang Jong Hee Networth: दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. कंपनीनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हान यांनी कंपनीचा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल डिव्हाइस विभाग हाताळला. त्याचवेळी दुसरे को-सीईओ जून यंग-ह्यून यांनी चिप व्यवसायाची जबाबदारी सांभाळली आहे. सॅमसंगनं हान यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.
इन्हा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर हान जोंग-ही यांनी १९८८ मध्ये सॅमसंगमध्ये काम करण्यास सुरुवात केली. २०११ ते २०१३ या काळात ते कंपनीच्या प्रॉडक्ट आर अँड डी टीमचे प्रमुख होते. हान यांनी २०१७ मध्ये व्हिज्युअल डिस्प्ले व्यवसायाची सूत्रं हाती घेतली. २०२१ मध्ये त्यांना उपाध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा टीव्ही व्यवसाय उच्च पातळीवर नेण्याचं श्रेय त्यांनाच दिलं जातं.
त्यांची नेटवर्थ किती?
analyticsinsight.net नुसार, ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत हान यांची एकूण संपत्ती अंदाजे ९७१,२९१ डॉलर होती. simplywall.st या वेबसाईटनुसार त्यांचं वार्षिक पॅकेज ६.९० अब्ज वोन (सुमारे ४८.३ लाख डॉलर) होतं. सॅमसंगचे शेअर्स गेल्या वर्षभरात सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या टेक शेअर्सपैकी एक आहेत. वेगानं विकसित होत असलेल्या एआय सेमीकंडक्टर बाजारपेठेला पुरेसा प्रतिसाद देण्यात कंपनी अपयशी ठरल्याचं हान म्हणाले होते.