>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - सॅमसंगनं न्यू यॉर्कमध्ये आयोजित "अनपॅक्ड 2017" या कार्यक्रमात गॅलक्सी सीरिजचे लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले आहेत. गॅलक्सी एस-8 आणि एस-8 प्लस हे दोन नवीन मॉडेल बुधवारी लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स 21 एप्रिलपासून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र, याची किंमत व भारतीय बाजारात हा फोन कधी येणार याबाबत सॅमसंगनं अद्याप खुलासा केलेला नाही.
सॅमसंग गॅलक्सी S8 मध्ये 5.8 इंच आणि गॅलक्सी S8 प्लसमध्ये 6.2 इंच डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये रेझ्युलेशन 1440×2960 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचे कर्व्ह्ड एज देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. डिव्हाईसच्या रिअर पॅनलच्या कॅमेऱ्याखाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे.
गॅलक्सी S8 आणि S8 प्लसमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
गॅलक्सी S8 आणि S8 प्लसच्या प्रोसेसरसाठी कंपनीनं 10nm चिपसेट तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे बॅटरी लवकर संपणार नाही. दोन्ही फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचं स्टोरेज देण्यात आलं आहे. .
गॅलक्सी S8 मध्ये 3,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर S8 प्लसमध्ये 3,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. काळा, ऑर्किड ग्रे, करडा, सोनेरी आणि निळ्या अशा पाच रंगात हे दोन्ही फोन उपलब्ध असणार आहेत.