विनायक पात्रुडकर - बँकॉक भारतीय बाजारात स्मार्टफोनचा घसरता टक्का लक्षात घेत अग्रस्थान टिकवून ठेवण्यासाठी सॅमसंग कंपनीने, सोमवारी येथे काही नव्या उत्पादनांची घोषणा केली. सर्वांत कमी जाडीचा गॅलक्सी ए-सेव्हन हा नवा मोबाईल फोन भारतीय बाजारात नवा आयकॉन ठरेल, असा दावा सॅमसंग कंपनीने केला आहे. स्लिमेस्ट मेटल बॉडी असलेला हा स्मार्टफोन सेल्फी एक्सपिरियन्ससाठी आजवरचा सर्वोत्कृष्ट फोन असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. बँकॉकमध्ये झालेल्या सॅमसंग फोरममध्ये मोबाइलबरोबरच नवा एसएचडी टीव्ही, निओ एसी, अॅक्टिव्ह वॉश -वॉशिंग मशीन तसेच किचनसाठी लागणाऱ्या काही उत्पादनांची घोषणाही केली. कर्व्ह टीव्हीमध्ये एसयूएचडी तंत्राचा वापर असलेला टीव्ही भारतीय ग्राहकांना नक्की भुरळ घालेल, असे सॅमसंगचे भारतीय प्रांताचे अध्यक्ष हुंगचिल हाँग यांनी सांगितले. आवाज आणि चित्रांचा उच्च दर्जा तसेच रंगसंगतीची बारकावे या नव्या तंत्रज्ञानामध्ये टिपण्यात आले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहताना नवी अनुभूती मिळेल, असा दावाही त्यांनी केला. सॅमसंग फोरममध्ये फोर जी सेवा उपलब्ध असलेले गॅलक्सी ग्रँड प्राईम, कोअर प्राईम आणि गॅलक्सी जे-वन या उत्पादनांची घोषणा करण्यात आली. फोर जी सेवेतून मोठ्या प्रमाणात डेटा कव्हरेज मिळेल. ज्यामुळे या पायाभूत सेवेच्या उभारणीसाठी लागणाऱ्या गुंतवणुकीची बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे. भारताच्या विकासाकरिता केंद्र शासनाच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आधार अशा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्येही कंपनी सक्रिय आहे. दक्षिण-पश्चिम आशियामधील ग्राहकांचा विश्वास मिळवण्यात कंपनीला यश मिळाल्याचे सॅमसंग इंडियाचे अनुज जैन यांनी सांगितले. या फोरममध्ये गॅलक्सी टॅब अॅक्टिव्ह या विशेष बिझनेस टॅबचीही घोषणा करण्यात आली. बदलत्या उद्योग क्षेत्राचे आव्हान पेलण्यासाठी हा नवा टॅब वेगवेगळ्या फिचर्सने सज्ज असल्याचे जैन यांनी सांगितले.भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमधील बाजारपेठा काबीज करण्याचा सॅमसंगचा विचार आहे.सध्या भारतीयांच्या बदलत्या राहणीमानाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादने देण्याचा आमचा विचार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.या वेळी सॅमसंगचे संचालक राजीव भुतानी, सरव्यवस्थापक ऋषी सुरी आदींनी नव्या उत्पादनांची माहिती दिली.
सॅमसंगचे टार्गेट आता भारतीय ग्राहक
By admin | Published: February 18, 2015 12:18 AM