Join us  

वाळू उपसा करणार्‍या यांत्रिक बोटी जप्त!

By admin | Published: January 07, 2016 12:17 AM

प्रशासनाची कारवाई: अधिकृत ठेकेदाराला संरक्षण देण्याऐवजी कारवाईचा सपाटा, बेकायदेशीर वाळू उपशाकडे दुर्लक्ष

प्रशासनाची कारवाई: अधिकृत ठेकेदाराला संरक्षण देण्याऐवजी कारवाईचा सपाटा, बेकायदेशीर वाळू उपशाकडे दुर्लक्ष
सोलापूर: यांत्रिक बोटीने वाळू उपसा सुरू असल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शहाजी पवार आणि उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांनी बुधवारी सकाळी तेलगाव-अरळी (ता़ दक्षिण सोलापूर) येथील वाळू ठेकेदाराच्या बोटी आणि ट्रक जप्त केले आहेत़ तसेच त्या ठिकाणी असलेल्या वाळू ठेकेदाराचे कार्यालय सील केले आह़े
नदीपात्रात पाणी आह़े यांत्रिक बोटींचा परवाना तातडीने देऊ, असे जिल्हाधिकार्‍यांनी ठेके घेताना सांगितले होते. मात्र आता ते मंत्रालयाकडे बोट दाखवित आहेत. त्यामुळे नदीपात्रात पाणी असताना आणि आम्ही करोडो रुपयांचा महसूल भरला असताना हाताने वाळू उपसायची का, असा सवाल ठेकेदार करीत आहेत़ आम्ही यांत्रिक बोटीसह ताबा द्या, अशी मागणी केली तरी ती दिली नाही. उलट आम्हाला सक्तीने ताबे दिले, असे ठेकेदारांचे म्हणणे आह़े
प्रांताधिकारी शहाजी पवार तसेच उपजिल्हाधिकारी (महसूल) रेश्मा माळी यांनी ही कारवाई केली़ वास्तविक पाहता वाळू उपसा करणार्‍या बोटी त्यांना सापडल्या नाहीत, त्या नदीपात्रात नव्हत्या तसेच वाळूने भरलेले देखील ट्रक नव्हते. रिकाम्या ट्रकचे क्रमांक नोंदवून चुकीचा पंचनामा केला असल्याचे ताकमोगे यांनी सांगितल़े माझ्या ठेक्यावर 20 दिवसांत 17 वेळा भेटी दिल्या आहेत़ मंडल अधिकारी दोन-दोन वेळा येतात, एवढे लक्ष दुसरीकडे दिले तर अनधिकृत वाळू उपसा बंद होईल, असे ते म्हणाल़े
अनधिकृत वाळूवर कारवाई करण्याऐवजी ज्यांनी ठेके घेतले त्यांच्याकडेच मंडल अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी वारंवार खेटे मारतात़ जिल्हा प्रशासन गैरकृत्यांना न अडविता ज्यांनी शासनाला करोडो रुपयांचा महसूल भरला त्यांच्यावर कारवाया करत आह़े आठपैकी व्होळे-कौठाळी (ता़ पंढरपूर ) हा एकच वाळू ठेका सुरू आह़े त्यामुळे अनधिकृतपणे मोठय़ा प्रमाणावर वाळू उपसा सुरू आह़े त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा वाळू ठेकेदारांचा आरोप आह़े
चौकट़़़
कारवाईबाबत माळी यांचे मौन
उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांच्याशी अधिकृत माहिती घेण्याबाबत संपर्क साधला मात्र त्यांनी मोबाईल उचलला नाही़ दुपारच्या सत्रात त्या कार्यालयात देखील नव्हत्या़ अनधिकृत वाळू उपशाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन करोडो रुपये भरलेल्या वाळू ठेकेदारांच्या पाठीमागे लागत असल्याचे वारंवार दिसत़े जिल्हाधिकारी मुंबईत असल्यामुळे बहुतांश अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे सर्वत्र सामसूम होती़ चिंचपूर, भंडारकवठे, औज, कुरघोट, होनमुर्गी, बाळगी येथे बिनधास्त वाळू उपसा सुरू आहे मात्र इथे प्रशासनाचे कोणीही फिरकत नाही़ याबाबत माळी देखील काही बोलत नाहीत़
कोट़़़
आम्ही 22 कोटी रुपये भरुन 72 हजार 321 ब्रास वाळूचा ठेका घेतला आह़े यांत्रिक बोटीला मंजुरी देण्याची फाईल मंत्रालयात जिल्हाधिकार्‍यांनी पाठविली आहे, त्यामुळे आम्ही पूर्वतयारी म्हणून बोटी आणल्या आहेत़ आजवर फक्त 2400 ब्रास वाळू उपशा केला आह़े आम्हाला बोटीसह ठेक्याची परवानगी हवी होती, मात्र सक्तीने आम्हाला वाळू ठेक्याचा ताबा घ्यायला सांगितला़ नदीपात्रात पाणी आहे त्यामुळे एवढे मोठे पैसे भरुन आम्ही वाळू कशी काढायची हे तरी प्रशासनाने सांगाव़े चुकीचे पंचनामे करुन कारवाई केली जात आह़े
नागेश ताकमोगे, वाळू ठेकेदार