Join us  

जाणून घ्या, कोण आहेत ICICI बँकेला नवसंजीवनी देणारे संदीप बक्षी? XLRI मधून घेतलंय शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 7:56 PM

Sandeep Bakhshi : संदीप बक्षी यांनी 2018 मध्ये आयसीआयसीआय बँकेचे एमडी-सीईओ (MD-CEO) म्हणून पदभार स्वीकारला, त्यावेळी आयसीआयसीआय बँक अडचणीत आली होती. 

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) एमडी आणि सीईओ संदीप बक्षी (Sandeep Bakshi) हे भारतातील सर्वात जास्त वेतन घेणाऱ्या बँकर्सपैकी एक आहेत. संदीप बक्षी यांनी 2018 मध्ये आयसीआयसीआय बँकेचे एमडी-सीईओ (MD-CEO) म्हणून पदभार स्वीकारला, त्यावेळी आयसीआयसीआय बँक अडचणीत आली होती. 

आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली राजीनामा दिला होता. त्यामुळे लोकांचा बँकेवरील विश्वास उडाला होता. यानंतर बँकेला नवसंजीवनी देण्याचे काम संदीप बक्षी यांनी केले. त्यामुळे बँकेने गमावलेली विश्वासार्हता पुनर्संचयित करण्याचे श्रेय त्यांना जाते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये  संदीप बक्षी यांचा वार्षिक पगार 7.98 कोटी रुपये होता, जो दरमहा अंदाजे 65 लाख रुपये आहे. कोरोना संकटामुळे त्यांनी 2021 चा पगार सोडला होता.  संदीप बक्षी यांनी आयसीआयसीआय बँकेला ग्रोथ ट्रॅजॅक्टरीवर परत आणले आहे. त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा बीएसईमध्ये शेअरची किंमत 313.35 रुपये होती. 16 मार्च 2023 रोजी शेअर 825 रुपयांवर बंद झाला होता. यावरून गुंतवणूकदारांनी बँकेच्या व्यवस्थापनावर विश्वास दाखवल्याचे दिसून येते. संदीप बक्षी यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप सुमारे 5.74 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले.

XLRI मधून शिक्षणसंदीप बक्षी हे 1986 पासून आयसीआयसीआय ग्रुपशी जोडले गेले आहेत. एप्रिल 2002 मध्ये ते आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ झाले. त्यानंतर, ऑगस्ट 2010 ते जून 2018 पर्यंत, त्यांनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्समध्ये एमडी आणि सीईओ पदही भूषवले आहे. दरम्यान, संदीप बक्षी यांचा जन्म 28 मे 1960 रोजी झाला. 62 वर्षीय संदीप बक्षी यांनी चंदीगडच्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI), जमशेदपूर येथून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. 

टॅग्स :आयसीआयसीआय बँक