Join us

एकदम कडक! भारतीय विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात चहाचा स्टॉल; 'ड्रॉपआउट चायवाला' झाला करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 2:53 PM

Sanjith Konda House : ऑस्ट्रेलियातील शिक्षण सोडून चहा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि काही वेळातच तो करोडपती झाला.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे राहणाऱ्या संजीत कोंडा हाउसची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. त्याने ऑस्ट्रेलियातील शिक्षण सोडून चहा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि काही वेळातच तो करोडपती झाला. संजीतने २०१९ मध्ये मेलबर्नमध्ये 'ड्रॉपआउट चायवाला' नावाचा स्टॉल उघडला होता. त्याला ऑस्ट्रेलियन लोकांना भारतीय चहा आणि स्नॅक्सची ओळख करून द्यायची होती. केवळ पैसा मिळवणे हा त्याचा उद्देश नव्हता, तर भारतीय संस्कृती जगासमोर आणणे हा त्यांचा उद्देश होता. संजीत अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक बनला आहे.

संजीत हा ऑस्ट्रेलियातील ट्रोब विद्यापीठातून बीबीएचे शिक्षण घेत होता. पण त्याने शिक्षण अर्धवट सोडून चहा विकण्याचा मोठा निर्णय घेतला. संजीतने 'ड्रॉपआउट चायवाला' नावाची कंपनी सुरू केली. मेलबर्नमध्ये कॉफी प्रचलित असूनही लहानपणापासूनच चहाचा शौकीन असलेल्या संजीतला काहीतरी वेगळं करायचं होतं. असरार नावाच्या गुंतवणूकदाराचा त्याला पाठिंबा मिळाला आणि पुढे त्याने व्यवसायाच्या दिशेने पाऊल टाकलं. 

सुरुवातीला हे सोपं नव्हतं. संजीतला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, जसं की ग्राहकांना भारतीय चहाच्या चवीची सवय करून देणं आणि ऑस्ट्रेलियन बाजारपेठेतील स्पर्धा. पण, हळूहळू त्यांच्या मेहनतीला फळ मिळू लागलं. 'ड्रॉपआउट चायवाला' चा चहा आणि नाश्ता लोकांना आवडू लागला. तो लवकरच एक लोकप्रिय ब्रँड बनला.

मेलबर्नमध्ये कॉफी अधिक लोकप्रिय असली तरी संजीतचा चहा आणि समोसा व्यवसाय भारतीय समुदायाबरोबरच ऑस्ट्रेलियन आणि हिस्पॅनिक लोकांनाही खूप आवडला होता. एकीकडे भारतीयांना प्रसिद्ध 'बॉम्बे कटिंग' चहाचे वेड आहे, तर ऑस्ट्रेलियन लोकांना 'मसाला चहा' अधिक आवडतो.

आज संजीत एक यशस्वी उद्योजक आहे. मेलबर्नमध्ये त्यांचे अनेक स्टॉल्स आहेत. ऑस्ट्रेलियातील इतर शहरांमध्येही विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. संजीतचा रेव्हेन्यू हा ५.२ कोटी आहे. संजीत भारतातून चहा मागवतो आणि तिथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पार्ट टाईम नोकरीही देतो. संजीत हा सर्व तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. त्याने हे सिद्ध केले आहे की जर तुमच्यात आवड आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी