Join us

नवमीऐवजी सप्तमी... नवीन आयकर रिटर्नमध्ये

By admin | Published: April 03, 2017 4:45 AM

कृष्णा, २०१६-१७ चे आयकर रिटर्न दाखल करावयाचे फॉर्म्स आणले आहेत

सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २०१६-१७ चे आयकर रिटर्न दाखल करावयाचे फॉर्म्स आणले आहेत म्हणे. या फॉर्म्समध्ये अनेक बदल केले आहेत, ते काय आहेत?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, दरवर्षी आयकर विभाग मागील आर्थिक वर्षाचे रिटर्न दाखल करावयासाठी फॉर्म्स आणतात. यामध्ये अर्थसंकल्पात झालेल्या बदलानुसार व इतर माहिती करदात्याकडून गोळा करण्यासाठी फॉर्ममध्ये बदल केले जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये फॉर्म्स येतात. परंतु यावर्षी ३१ मार्चलाच फॉर्म्स आले आहेत. करदाते व त्यांच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार फॉर्मचे प्रकार असतात. आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंत एकूण ९ फॉर्म होते. परंतु सरकारने २०१६-१७ साठी ७ फॉर्म केले आहे. म्हणून नवीन आयकर रिटर्नमध्ये नवमीऐवजी सप्तमी झाले. आता पगारदार व्यक्तीसाठी आयटीआर १ आहे. पार्टनरशीप फर्मचे पार्टनर किंवा पगारदार कॅपिटल गेन उत्पन्न असणाऱ्यांंसाठी आयटीआर २ आहे. बिझनेस किंवा व्यावसायिकांसाठी आयटीआर ३ आहे. प्रीझम्पटिव तत्वावर उत्पन्न दाखविणाऱ्यांसाठी आयटीआर ४ आहे. पार्टनरशिप फर्मसाठी आयटीआर ५ तर कंपनी करदात्यासाठी आयटीआर ६ आणि ट्रस्ट व इतर करदात्यांसाठी आयटीआर ७ आहे.अर्जुन :कृष्णा, यावर्षी आयकर फॉर्म्समध्ये मुख्यत: बदल कोणते करण्यात आले आहेत?कृष्ण : अर्जुना, आयकर फॉर्म्समधील बदल खालील प्रमाणे.१) आधार कार्ड नंबर किंवा एनरोलमेंट आयडी नंबर प्रत्येक आयकर रिटर्नच्या फॉर्ममध्ये नमूद करणे अनिवार्य केले आहे. पार्टनरशिप फर्म असेल, तर पार्टनरचा आधार नंबर नमूद करावा लागेल.२) डीमॉनेटायझेशनच्या वेळी म्हणजेच ९ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान रोख रक्कम रु २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त बँकेत जमा केली असेल तर त्याची माहिती आयकर रिटर्नमध्ये द्यावी लागेल.३) ज्या उत्पन्नाची माहिती नाही, त्यावर ६० टक्के आयकर व सरचार्ज, सेस आहे. त्यासाठी अदर सोर्सेस या उत्पन्नच्या प्रकारामध्ये विशिष्ट जागा दिली आहे.४) जर डिव्हिडंडचे उत्पन्न १० लाखांच्या वर असेल, तर त्यावर १० टक्के आयकर आहे. त्यासाठी विशिष्ट जागा दिली आहे.५) पगारदार व्यक्ती, एक घर असणाऱ्यांसाठी व ५० लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांसाठी एकपानी सोपा फॉर्म आयटीआर १ आणला आहे.६) आयटीआर १ मध्ये कलम ८० सी म्हणजेच एलआयसी, पीपीएफ, इ. कलम ८० डी म्हणजेच मेडिक्लेम कलम ८० जी म्हणजेच डोनेशन कलम ८० टीटीए म्हणजे बचत खात्यावरील व्याज यांची वजावट घेण्यासाठी विशिष्ट जागा दिली आहे. इतर वजावट असेल तर ती एका जागी नमूद करावी लागेल.७) आयटीआर १ मध्ये १० लाख रुपयांपर्यंत डिव्हिडंडचे उत्पन्न असेल, तर ते नमूद करण्यासाठी तसेच करमाफ लाँग टर्म कॅपिटल गेन नमूद करण्यासाठी विशिष्ट जागा दिली आहे.८) पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी कलम ८० ईईमध्ये वजावट घेण्यासाठी विशिष्ट जागा दिली आहे.९) ५० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना अ‍ॅसेट लायबिलिटीची रक्कम नमूद करावी लागेल. परंतु आता यामध्ये अचल संपत्ती असेल, तर त्याची माहिती व पत्ता नमूद करावा लागेल. चल संपत्तीची माहिती द्यावी लागेल. तसेच जर पार्टनरशिप फर्ममध्ये गुंतवणूक केली असेल, तर गुंतवणूकीची रक्कम, फर्मचे नाव व पत्ता, पॅन नमूद करावा लागेल. ही तरतूद आयकर रिटर्न आयटीआर २ किंवा ३ किंवा ४ मध्ये रिटर्न दाखल करणाऱ्यांसाठी लागू आहे.१०) ज्या व्यक्ती प्रीझम्पटीव तत्वावर उत्पन्न दर्शवितात म्हणजेच हिशोबाची पुस्तके न ठेवता उलाढालीवर उत्पन्न दर्शवून कर भरतात, त्यांना वर्ष २०१६-१७ साठी २ कोटी पर्यंत उलाढाल असेल तर (अ) कलम ४४ ए डी अनुसार व्यापाऱ्यासाठी आर्थिक वर्षात नगदी व्यवहाराच्या लाढालीवर ८ टक्के व डिजिटल उलाढालीच्या व्यवहारावर ६ टक्के उत्पन्न दर्शविण्यासाठी जागा दिली आहे. (ब) नवीन कलम ४४ ए डी ए अनुसार प्रोफेसनल्ससाठी उलाढालीच्या ५० टक्के उत्पन्न दाखविण्याच्या तरतुदीसाठी विशिष्ट जागा दिली आहे.११) आयटीआर ४ मध्ये म्हणजेच प्रीझम्पटीव तत्वावर उत्पन्न दाखविण्याच्या फॉर्मच्या टीडीएसच्या शेड्युलमध्ये यापूर्वी फक्त टीडीएसची रक्कम नमूद केली जायची. आता ज्या रकमेवर टीडीएस झाला, ती रक्कमही नमूद करावी लागेल.१२) आयटीआर ७ म्हणजेच ट्रस्टचे रिटर्न दाखल करताना आता ट्रस्टचे इतर कायद्यांतर्गत आॅडिट झाले असेल तर ते नमूद करावे लागेल. तसेच उत्पन्नाचा विनियोग कसा झाला म्हणजेच भांडवली वस्तुवार किंवा धर्मादाय व धार्मिक कामासाठी झाला ते नमूद करावे लागेल.>अर्जुन : कृष्णा, रामनवमी व आयकराचे नवीन रिटर्न या अनुषंगाने करदात्याने काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, श्रीरामाने जसे भाऊ लक्ष्मण, पत्नी सीता, भक्त हनुमान, मित्र सुग्रीव या सर्वाना सोबत घेऊन रामराज्य स्थापन केले, तसेचजीवनात प्रत्येकाने आपले आई-वडील, भाऊ-बहीण, व इतर सर्वांमध्ये समन्वय ठेवून कार्य करावे, करदात्याने आपल्या घरातील सर्व व्यक्तीचे आर्थिक नियोजन करून आयकर रिटर्न भरावे. याशिवाय सर्व कुटुंबातील व्यक्तीचे आर्थिक नियोजन (टॅक्स प्लॅनिंग) आयकर किंवा इतर कायद्याच्या मर्यादेत राहूनच करावे। नसता मनस्ताप व आर्थिक नुकसान होऊ शकते.