मुंबई : फोर्ब्ज या आघाडीच्या अर्थविषयक जागतिक मासिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बॅँक असलेली सारस्वत सहकारी बॅँक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची बॅँक ठरली आहे. सिंगापूर येथे मुख्यालय असलेली डीबीएस बॅँक ही अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.फोर्ब्ज या मासिकातर्फे मार्केट रिसर्च फर्म असलेल्या स्टॅटिस्टाच्या सहकार्याने जगभरातील २३ देशांमधील चांगल्या बॅँकांची यादी एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली. त्यामध्ये भारतातील अव्वल स्थान डीबीएस बॅँकेने पटकविले असून सारस्वत बॅँक दुसºया स्थानावर आहे. एचडीएफसी बॅँक तिसºया, आयसीआयसीआय बॅँक चौथ्या तर स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅँक पाचव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या स्टेट बॅँकेला अकरावे स्थान मिळाले आहे.या सर्वेक्षणात जगभरातील ४० हजार बॅँक ग्राहकांना त्यांच्या बॅँकेशी असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बॅँकांचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक अशा बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या ग्राहकांनी दिलेल्या उत्तरांवरून ही यादी तयार करण्यात आली आहे.आमच्या ग्राहक आणि भागधारकांनी दाखविलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे समर्पित होऊन दिलेली सेवा यामुळेच हे यश मिळाले आहे. एका सहकारी बॅँकेला मिळालेला हा बहुमान सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.-गौतम ठाकूर, अध्यक्ष सारस्वत बॅँक
सारस्वत बॅँकेने पटकावला भारतातील दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 2:22 AM