मुंबई : आर्थिक दृष्टिकोनातून म्हापसा बँकेचा विलीनीकरणाचा प्रस्ताव स्वीकारणे व्यवहार्य नाही. आर्थिक मापदंडाचा विचार करता म्हापसा बँकेचा विलीनीकरणाचा प्रस्ताव स्वीकारणे आमच्या कार्यात बसत नाही. या कारणास्तव आम्ही म्हणजे सारस्वत बँकेने म्हापसा बँकेचा विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला आहे, अशी माहिती सारस्वत बँकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.म्हापसा अर्बन बँकेला व्यवहार बंदीच्या संकटातून वाचविण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले. आरबीआयने म्हापसा बँकेवर लागू केलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे बँकेला संकटातून वाचविण्यासाठी संचालक मंडळाने डोंबिवली नागरी सहकारी बँक, पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँक, ठाणे जनता सहकारी बँक यांच्याकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठविला होता. सप्टेंबर महिन्यात भागधारकांच्या बैठकीत पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँक आणि इतर आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकेसोबत विलीनीकरणाचा ठराव संमत करण्यात आला. मात्र ठरावाच्या काही दिवसांत पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी म्हापसा बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत खंड पडला. या कारणास्तव म्हापसाने आणि सरकारच्या सहकार खात्याने ठाणे जनता सहकारी बँकेसोबत विलीनीकरणाची बोलणी सुरू केली. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे म्हापसाने सारस्वत बँकेसोबत बोलणी सुरू केली. बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रमाकांत खलप आणि अध्यक्ष गुरूदास नाटेकर यांनी मुंबई येथे दाखल होत सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्याशी चर्चा केली. या वेळी म्हापसा बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ठाकूर यांच्या समोर मांडण्यात आला.म्हणून प्रस्ताव हाताळणे योग्य नाही!म्हापसा बँकेच्या प्रस्तावावर सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती झालेल्या निर्णयांवर माहिती देताना सारस्वत बँकेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, म्हापसा बँकेने विलीनीकरणाचा जो प्रस्ताव दिला होता; त्या प्रस्तावावर आम्ही विचार केला. मात्र तो प्रस्ताव व्यवहार्य नाही, असे आम्ही म्हापसा बँकेला कळविले आहे. म्हणजे एका अर्थाने म्हापसा बँक-सारस्वत विलीनीकरण होऊ शकत नाही. सारस्वत बँकेच्या दृष्टीने म्हापसा बँकेचा प्रस्ताव व्यवहार्य नाही. त्यामुळे म्हापसा बँकेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.आर्थिक मापदंडाचा विचार करता म्हापसा बँकेचा प्रस्ताव हाताळणे योग्य नाही. आर्थिक बाबींचा विचार करता म्हापसा बँकेचा प्रस्ताव स्वीकारणे योग्य वाटत नाही. बँकेच्या व्यवहाराबाबत आम्ही काही बोलू इच्छित नाही. मात्र म्हापसा बँकेची आर्थिक घडामोड किंवा कागदपत्र पाहता, म्हापसा बँकेची आर्थिक स्थिती पाहता सदर बँक सारस्वत बँकेत विलीन करणे व्यवहार्य होणार नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. परिणामी सारस्वत बँकेने म्हापसा बँकेचा विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
सारस्वत बँकेने म्हापसा बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:02 AM