Join us  

जागतिक अस्थिरतेतही समाधानकारक परतावा

By admin | Published: June 24, 2016 12:55 AM

भारतीय शेअर बाजारात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात अस्थितरता असली तरी, या कालावधीत गुंतवणूकदारांना सरासरी १६ टक्क्यांचा परतावा मिळाला आहे

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात अस्थितरता असली तरी, या कालावधीत गुंतवणूकदारांना सरासरी १६ टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. परताव्याचे हे प्रमाण विकसित देशांपेक्षा आणि आशिया खंडातील अन्य बाजारांपेक्षा लक्षणीय असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. तसेच या निमित्ताने इतर देशांच्या तुलनेत आजही परकीय गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार हेच ‘फेव्हरेट’ ठिकाण असल्याचे दिसून आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, भारतात जरी स्थिर सरकार असले तरी जागतिक पातळीवरील अर्थकारणात घडलेल्या घडामोडींबाबत येथील बाजाराने बहुतांश वेळा सावध पवित्रा घेत आणि संवेदनशीलपणे प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली. त्यातच राजकारणाच्या आखाड्यात अनेक आर्थिक सुधारणा अडकल्याचीही प्रतिक्रिया शेअर बाजारावर उमटली. मात्र जागतिक अर्थकारणात कितीही अस्थिरता असली तरी त्या तुलनेमध्ये देशांतर्गत पातळीवर सुधार दिसून येत आहे. उत्पादन क्षेत्रावरील मंदीचा जोर ओसरून काही प्रमाणात पुन्हा उत्पादनाने जोर घेतला आहे. मुख्य म्हणजे, या उत्पादनांची निर्यातही होताना दिसत असल्यामुळे निर्यातीच्या आकड्यातही सुधार दिसल्याने, १४ वर्षांनंतर प्रथमच अनेक कंपन्यांच्या बॅलेन्स शीटमध्ये नफ्याने प्रवेश केला आहे. कंपन्यांच्या कामगिरीवर जसजसा हा प्रभाव दिसत आहे, त्याचेच प्रतिबिंब हे कंपन्यांच्या समभागांच्या कामगिरीवरही उमटताना दिसत आहे. परिणामी, समभागांचे भाव वाढतानाच गुंतवणूकदारांना परतावाही चांगला मिळाला असल्याचे विश्लेषण शेअर बाजार अभ्यासक निमिष मेहता यांनी केले. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या दीड वर्षाचा आढावा घेतला तर भारतीय शेअर बाजाराच्या तुलनेत अमेरिका, युरोपातील प्रमुख शेअर बाजारांनी दिलेल्या परताव्याचे सरासरी प्रमाण हे ६ ते ७ टक्क्यांपेक्षा अधिक नाही. आशिया खंडातील सिंगापूर, हॉँगकॉँग, चीन या प्रमुख शेअर बाजारांचा विचार केला तर इथले प्रमाणही सरासरी ८ ते १० टक्क्यांच्या पलीकडे नाही. त्या तुलनेत भारतीय शेअर बाजारांनी दिलेला परतावा हा निश्चितच घसघशीत आहे. २००८ ते सप्टेंबर २०१३ या जागतिक मंदीच्या प्रदीर्घ फेऱ्यामुळे भारतीय शेअर बाजारानेही मंदीचे एक प्रदीर्घ आवर्तन अनुभवले. सप्टेंबर २०१३ नंतर मंदीचा प्रभाव कमी झाल्यानंतर भारतीय बाजारात पुन्हा एकदा तेजीने प्रवेश केला. त्यापाठोपाठ मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भक्कम बहुमताचे सरकार आल्यामुळे स्थैर्य आणि आर्थिक सुधारणा या मुद्यांच्या अनुषंगाने बाजारात चैतन्य आले आणि त्यानंतर वर्षभर बाजाराने मोठ्या प्रमाणावर तेजी अनुभवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने तर २९ हजारांच्या सर्वोच्चांकाला स्पर्श केला. पण, त्यानंतर ग्रीसमधील आर्थिक समस्या आणि त्याचे जागतिक बाजारात उमटलेले प्रतिकूल परिणाम आणि दुसरीकडे आर्थिक सुधारणांबाबत सरकारची झालेली कोंडी यामुळे भारतीय बाजारात मंदीने चंचूप्रवेश केला. तरीही ‘बाजारपेठ’ म्हणून परकीय गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्याची क्षमता आणि देशांतर्गत अर्थकारणातील सुधार यामुळे भारतीय बाजाराने उत्तम परतावा दिला आहे. (प्रतिनिधी)म्युच्युअल फंडामुळे सामान्य गुंतवणूकदारही खूशभारतीय भांडवली बाजारातील तेजीची चुणूक बघून सामान्य गुंतवणूकदारांनी म्युच्यअल फंडाच्या माध्यमातून बाजारात प्रवेश केला. गेल्या दीड वर्षाचा आढावा घेता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनाही १४ ते १६ टक्क्यांचा समाधानकारक परतावा मिळाल्याचे दिसते.