Join us

खूशखबर! देशात पेट्रोल-डिझेल आणखी महागणार नाही; सौदी अरेबियाचं भारताला दिवाळी गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:48 PM

सौदी अरेबियानं सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात ड्रोन हल्ला केला होता.

नवी दिल्लीः सौदी अरेबियानं सरकारी तेल कंपनी असलेल्या अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात ड्रोन हल्ला केला होता. कंपनीवर हल्ला झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव भडकले होते. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. आधी आर्थिक मंदीतून जात असलेल्या भारताला वाढत्या तेलाच्या दरामुळे मोठा झटका बसू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदीचे ऊर्जामंत्री अब्दुल अजीज बिन सलमान यांच्याशी फोनवर बातचीत केली. तसेच भारताला होत असलेला तेल पुरवठा प्रभावित करू नये, अशी विनंती केली.सौदी अरेबियानंही भारताला होत असलेल्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये खंड पडणार नसल्याचं सांगत एका विशिष्ठ प्रकरचा पुरवठा कायम करत राहू, असं आश्वासन दिलं. भारताला जेवढ्या तेलाची आवश्यकता आहे, तेवढ्या तेलाचा सौदी अरेबिया पुरवठा करेल, असंही सौदीचे ऊर्जामंत्री अब्दुल अजीज बिन सलमान यांनी सांगितलं. भारत सौदी अरेबियाकडून जवळपास 18 टक्के तेल खरेदी करतो. गेल्या वर्षी भारतानं 39.8 मिलियन मॅट्रिक टन तेल आयात केलं होतं. तसेच भारतातला 30 टक्के एलपीजी सौदी अरेबियातून येतो. अरामकोवर दहशतवादी हल्ल्यानंतरही सौदीनं भारताला करण्यात येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात कोणतंही अंतर केलं नसल्यानं मोदींही त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.मंगळवारी भारत आणि सौदी अरेबियादरम्यान द्विपक्षीय सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा अशा क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. या करारांतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षांनी सौदीचे प्रिन्सची भेट घेणार आहेत.  नव्या भागीदारीनुसार प्रत्येक वर्षी परराष्ट्र आणि व्यापाराशी संबंधित मंत्र्यांची बैठक होणार आहे. सौदी अरेबियानं आधीच ब्रिटन, फ्रान्स आणि चीनबरोबर सामंजस्य करार केलेला आहे. आता भारताबरोबर असा करार करणार सौदी अरेबिया हा चौथा देश आहे.  

टॅग्स :पेट्रोल