न्यूयॉर्क :
टेस्लाचे प्रमुख इलाॅन मस्क यांनी दिलेला ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव ट्विटरचे हाय-प्रोफाईल गुंतवणूकदार तथा सौदी अरेबियाचे राजपुत्र अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी फेटाळून लावला आहे. मस्क यांचा प्रस्ताव फारच छोटा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी शुक्रवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले की, ‘इलाॅन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी लावलेली किंमत (५४.२० डॉलर प्रति समभाग) ट्विटरच्या वास्तविक किमतीच्या जवळ येते, असे मला वाटत नाही. ट्विटरचा सर्वात मोठा आणि दीर्घकालीन भागधारक म्हणून मी हा प्रस्ताव फेटाळून लावत आहे.’
तलाल यांच्या नेतृत्वाखालील किंगडम होल्डिंग कंपनीची (केएचसी) ट्विटरमध्ये गुंतवणूक आहे. राजपुत्र तलाल यांच्या ट्विटवर मस्क यांनी दोन प्रश्न विचारले आहेत. मस्क यांनी म्हटले की, ‘ट्विटरवर राजघराण्याची मालकी कशा प्रकारची आहे, थेट की अप्रत्यक्ष? पत्रकारांच्या भाषण स्वातंत्र्याबाबत राजघराण्याची भूमिका काय आहे?’ खरेदीचा प्रस्ताव देताना इलाॅन मस्क यांनी म्हटले होते की, प्रतिसमभाग ५४.२० डॉलरचे मूल्य देऊन आपण ट्विटरचे अधिग्रहण करण्यास तयार आहोत. मस्क यांच्या प्रस्तावावर विचार करू, असे ट्विटरने म्हटले होते. या प्रस्तावापूर्वीच मस्क यांनी ट्विटर समभागांची खरेदी सुरू केली आहे.
‘प्लॅन बी’ तयार - मस्क
आपण कंपनी ताब्यात घेण्यात यशस्वी ठरू, याची आपणास खात्री नाही. तांत्रिकदृष्ट्या हे परवडू शकते. तथापि, मला त्यात यश येईल, असे वाटत नाही. त्यामुळे माझा प्रस्ताव अयशस्वी झालाच तर माझ्याकडे ‘प्लॅन बी’ तयार आहे.
- इलाॅन मस्क, प्रमुख, टेस्ला