नवी दिल्ली : जागतिक स्तरावर सर्वात मोठा तेल आयातदार असणा-या भारतालाखनिज तेलाचा पुरवठा करणाऱ्यांच्या यादीतील सौदी अरेबिया आता आपले अव्वल स्थान पुन्हा पटकावणार आहे. सौदीने रिलायन्सच्या तेल-रसायने (आॅइल-टू-केमिकल) व्यवसायात २० टक्के हिस्सा खरेदी केल्याने या उभय देशांतील खनिज तेलाच्या देवाण-घेवाणीत वाढ होणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला खनिज तेलपुरवठा करणाºयांच्या यादीतील अव्वल स्थान सौदीने दोन वर्षांपूर्वी गमावले होते. सध्या भारताला इराककडून सर्वाधिक खनिज तेल पुरवले जाते. पण सौदीची तेल उत्पादक कंपनी असलेल्या अराम्को या कंपनीने ७५ अब्ज डॉलर अदा करत रिलायन्समध्ये २० टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या माध्यमातून आता सौदी पाच लाख बॅरल प्रतिदिन म्हणजेच वर्षाला २५ दशलक्ष टन खनिज तेलाचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे सौदी पुन्हा पुरवठादारांच्या यादीतील आपले अव्वल स्थान पटकावणार आहे. सौदी अरेबियाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताला ४०.३३ दशलक्ष टन इतक्या तेलाची निर्यात केली. तर याच काळात इराकने भारताला ४६.६१ दशलक्ष टन इतके म्हणजे सौदीपेक्षा १५ टक्के जास्त तेल निर्यात केले, असे वाणिज्य सांखिकी महासंचालनालयाच्या नोंदीतून समोर आले आहे. (वृत्तसंस्था)
भारताला तेलपुरवठा करणाऱ्यांत सौदी अव्वल स्थान पटकावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 3:08 AM