Join us

तेलात पैसे वाचले! पण लोकांना फटका; सरकारचे २.०८ लाख कोटी वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 7:41 AM

कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल १६ टक्क्यांनी कमी झाले; सरकारचे २.०८ लाख कोटी वाचले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण केंद्र सरकारसाठी मोठी फायद्याची ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २०२३ ते २०२४ दरम्यान देशातील कच्च्या तेलाच्या आयात बिलामध्ये  १६ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे केंद्र सरकारचे २५.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २.०८ लाख कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना दिलासा देता आला असता.

पेट्रोलियम मंत्रालयानुसार, कच्चे तेल स्वस्तात मिळत असल्याने भारत परदेशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहत आहे. भारताने २०२३-२४ या आर्थिक वर्षात २३.२५ कोटी टन कच्चे तेल आयात केले. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आयातीसाठी १३२.४ अब्ज डॉलर्स देण्यात आले. तर २०२२-२३ मध्ये ही रक्कम १५७.५ अब्ज डॉलर्स होती.  त्यामुळे केंद्र सरकारचे २५.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २.०८ लाख कोटी रुपये वाचले आहेत.

एलपीजी किती आयात केला? - कच्च्या तेलाव्यतिरिक्त, भारताने एलपीजी सारख्या ४.८१ कोटी टन पेट्रोलियम उत्पादनांची आयात केली.- यासाठी २३.४ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले. ४७.४ अब्ज डॉलर्स किमतीची ६.२२ कोटी टन उत्पादने निर्यात करण्यात आली.- तेलाव्यतिरिक्त, भारत द्रव स्वरूपात गॅस देखील आयात करतो, ज्याला एलएनजी म्हणून ओळखले जाते.

युद्धाचा फटका२०२२-२३च्या किमती वाढल्याच्या झटक्यानंतर ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ३०.९१ अब्ज घनमीटर गॅसची आयात करण्यात आली. यासाठी १३.३ अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले. त्या तुलनेत २०२२-२३ मध्ये २६.३ अब्ज घनमीटर गॅसच्या आयातीवरील खर्च १७.१ अब्ज डॉलर्स होता. युद्धामुळे ऊर्जेच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या.

आयात नेमकी का वाढली?  भारताचे देशांतर्गत तेल उत्पादन घटले आहे. त्यामुळे तेल आयात वाढली आहे. २०२३-२४ मध्ये कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व वाढून ८७.७ टक्के झाले आहे. मागील आर्थिक वर्षात हेच प्रमाण ८७.४ टक्के होते. 

- २.९४ कोटी टन इतके देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन २०२३-२४ मध्ये झाले आहे.- १२१.६ अब्ज डॉलर्स इतके निव्वळ तेल आणि वायू आयात बिल (निर्यातींमधून कच्चे तेल, पे. उत्पादने, एलएनजीचे आयात बिल वजा करून) २०२३-२४ मध्ये होते. मागील वर्षात हेच बिल १४४.२ अब्ज डॉलर्स होते.

आपण कशात होतोय सक्षम? देशात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी असले तरी प्रक्रिया करण्याच्या क्षमतेत आपण विशेष प्रगती केली आहे. यामुळे आपण डिझेलसारख्या पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करण्यास सक्षम आहोत. 

निर्यात घटलीदेशाच्या एकूण आयातीच्या (मूल्याच्या दृष्टीने) टक्केवारीत पेट्रोलियम आयात २५.१ टक्के होती, जी २०२२-२३ मधील २८.२ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. त्याचप्रमाणे, देशाच्या एकूण निर्यातीची टक्केवारी म्हणून पेट्रोलियम निर्यात २०२३-२४ मध्ये १२ टक्क्यांवर आली, जी मागील वर्षीच्या १४ टक्क्यांच्या तुलनेत कमी झाली आहे. 

टॅग्स :पेट्रोलसरकार