हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर मोठ्या संकटात सापडलेल्या अदानींना तारणारे जीक्युजी पार्टनर्सचे राजीव जैन यांच्यासमोरच आता एक समस्या निर्माण झाली आहे. राजीव जैन यांच्या मालकीची जीक्यूजी पार्टनर्स या कंपनीनं पाच लाख डॉलरचा दंड भरण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेच्या बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशननं कंपनीवर व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप स्वीकारण्याऐवजी किंवा नाकारण्याऐवजी त्यावर तोडगा काढण्याचं कंपनीने मान्य केलं आहे. यासाठी कंपनी ५ लाख डॉलरचा दंड भरणार आहे. जीक्यूजी पार्टनर्सनं गेल्या वर्षी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती.
एसईसीच्या म्हणण्यानुसार जीक्युजीनं व्हिसलब्लोअर सिक्युरिटीच्या एका नियमाचं उल्लंघन केलंय. नियामकानं जीक्यूजीवर रोजगारासाठी उमेदवार आणि माजी कर्मचाऱ्याशी करार केल्याचा आरोप केला, ज्यामुळे एसईसीकडे संभाव्य सिक्युरिटीज कायद्याच्या उल्लंघनाची तक्रार करणं त्यांना अधिक कठीण झालं, असं सांगण्यात आलं.
भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक
एसईसीनुसार कंपनीनं नोव्हेंबर २०२० ते सप्टेंबर २०२३ पर्यंत १२ कर्मचाऱ्यांसह नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट केल्याचं म्हटलंय. यामुळे त्यांना जीक्यूजीच्या गोपनीय माहितीचा खुलासा करण्यापासून रोखण्यात आलं. एसईसीच्या म्हणण्यानुसार जीक्युजीनं माजी कर्मचाऱ्यासोबत सेटलमेंट अॅग्रीमेंड केलं. त्यांच्या वकिलांनी जीक्यूजीला धमकी दिली होती की ते सिक्युरिटीज कायद्याच्या कथित उल्लंघनाची तक्रार नियामकाकडे करतील. जीक्यूजी पार्टनर्सनं भारतातील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये अदानी समूहाच्या सहा कंपन्यांचा समावेश आहे.