नवी दिल्ली - सध्या सुरू असलेली ८ टक्के व्याजदराची भारत सरकारची बचत रोखे योजना (जीओआय सेव्हिंग्ज बाँड स्कीम) बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याजागी ७.७५ टक्के व्याजदराची नवी बचत रोखे योजना आणण्यात येणार आहे. १0 जानेवारीपासून नवी योजना सुरू होणार असल्याचे वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, ७.७५ टक्के व्याजदराची बचत (करपात्र) रोखे, २0१८ ही योजना १0 जानेवारीपासून सुरू होत आहे. निवासी नागरिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना या योजनेत अमर्याद गुंतवणूक करता येईल. एका रोख्याची किंमत १ हजार रुपये असेल. हे रोखे केवळ ‘बाँड लेजर अकाउंट’वर डीमॅट स्वरूपातच वितरित होतील. या बाँडवर जे काही व्याज मिळेल त्यावर खरेदीदारास लागू असलेल्या दराने आयकर द्यावा लागेल.सध्याची बचत रोखे योजना २00३ साली सुरू करण्यात आली होती. ती बंद करण्यात येत असल्याची घोषणा सरकारच्या वतीने सोमवारी करण्यात आली होती. तथापि, त्यानंतर मंगळवारी अर्थसचिव एस. सी. गर्ग यांनी सांगितले की, ८ टक्के बचत रोखे योजना बंद करण्यात येत नसून तिच्या जागी ७.७५ टक्के बचत रोखे योजना आणली जात आहे.एप्रिल २0१६मध्ये सरकारने मुदत ठेवी आणि पोस्टातील मासिक बचतीसारख्या अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी केला होता. त्यानंतर सरकारी रोखे बचत योजना हीच एकमेव निश्चित उत्पन्न देणारी योजना उरली होती. ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्तांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय होती.चिदंबरम यांनी केली होती टीकाबचत रोखे योजना बंद करण्यात येत असल्याबद्दल माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली होती. जीओआय ८ टक्के बचत रोखे योजना ही मध्यमवर्गीयांसाठी सुरक्षित गुंतवणूक योजना होती.निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांना २00३पासून या योजनेने मोठा आधार दिला होता. ही योजना बंद करून सरकारने त्यांचे सुरक्षा जाळेच काढून घेतले आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले होते. ती सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच तसे आवश्यकच होते, असे ते म्हणाले.
बचत रोख्यांवर यापुढे मिळेल ७.७५ टक्के व्याज, जुनी योजना बंद, नवी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:09 AM