नवी दिल्ली : बचत कमी झाली असली तरी ते कोणतेही मोठे संकट नाही. लोक इतर आर्थिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करत आहेत, असे म्हणत अर्थ मंत्रालयाने गुरुवारी घरगुती बचतीतील घसरणीवर होणारी टीका फेटाळून लावली.
जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने देशांतर्गत बचतीतील सर्वांत मोठी घसरण आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यासंदर्भातील टीका फेटाळून लावली. ग्राहक आता विविध आर्थिक उत्पादनांकडे झुकत आहेत. यामुळेच देशांतर्गत बचत कमी झाली आहे. त्यात चिंता करण्यासारखे मोठे कारण नाही, असे म्हटले.
मालमत्तेत वाढ
जून २०२० ते मार्च २०२३ दरम्यान घरगुती आर्थिक मालमत्तेत ३७.६ टक्क्यांनी वाढ झाली तर एकूण आर्थिक दायित्वांमध्ये ४२.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोघांमध्ये फार मोठा फरक नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात निव्वळ देशांतर्गत बचत जीडीपीच्या ५.१ टक्केच राहिली, जी गेल्या ४७ वर्षांतील सर्वात कमी बचत आहे.
२२.८ लाख कोटी रुपयांची निव्वळ आर्थिक मालमत्ता २०२०-२१ या आर्थिक वर्षात घरगुती स्तरावर जोडली गेली आहे.
१७ लाख कोटी रुपये २०२१-२२ मध्ये आणि १३.८ लाख कोटी रुपये २०२२-२३ मध्ये आर्थिक मालमत्ता वाढली.
६२% कर्ज हे घर खरेदी आणि वाहन खरेदीसाठी घेतले जात आहे.
लोक कर्ज का घेताहेत?
घरे आणि इतर रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी, पर्सनल लोनद्वारे इतर खरेदी वाहन कर्ज.