नवी दिल्ली: ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप-10 भारतीयांच्या यादीत त्यांचा समावेश झालाय. या यादीत त्या एकमेव महिला आहेत. विशेष म्हणजे, 18 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत 12 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
संपत्तीत झपाट्याने वाढ
फोर्ब्स वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $17.7 अब्ज आहे. त्या भारतातील सातव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहेत. तर, जगात त्यांचे स्थान 91 व्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये त्या जागतिक क्रमवारीत 234 व्या आणि 2020 मध्ये 349 व्या स्थानावर होत्या. 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती $9.7 बिलियन होती तर 2020 मध्ये $4.8 बिलियन होती. अशाप्रकारे केवळ दोन वर्षांत त्यांची संपत्ती साडेतीन पटीने वाढली आहे.
ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये निधन
जिंदाल समूहाचा व्यवसाय पोलाद, उर्जा, पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. 2005 मध्ये ओपी जिंदाल यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चार मुलांमध्ये गट विभागला गेला आणि चौघेही आता वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. सज्जन जिंदाल जेएसडब्ल्यू स्टील चालवतात तर नवीन जिंदाल जिंदाल स्टील अँड पॉवर चालवतात.
ही आहे टॉप-10 श्रीमंतांची यादी
फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत मुकेश अंबानी 90.7 अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहेत. 90 अब्ज डॉलर्ससह गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. शिव नाडर 28.7 अब्ज डॉलर्ससह तिसर्या, सायरस पूनावाला 24.3 अब्ज डॉलर्ससह चौथ्या, राधाकिशन दमानी 20 अब्ज डॉलरसह पाचव्या, लक्ष्मी मित्तल 17.9 अब्ज डॉलरसह सहाव्या, सावित्री जिंदाल 17.7 अब्ज डॉलरसह सातव्या, कुमार बिर्ला 16.5 अब्ज डॉलरसह आठव्या, दिलीप सांघवी 15.6 अब्ज डॉलर्ससह नवव्या आणि उदय कोटक 14.3 अब्ज डॉलर्ससह दहाव्या स्थानावर आहेत.