Join us

लग्नाच्या मोसमाची सोन्याला चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2015 11:46 PM

सलग दोन दिवस घसरण झाल्यानंतर सोन्याला लग्नाच्या मोसमाची चाहूल लागली असून मंगळवारी ते सावरले. सोन्याचे भाव १० ग्रॅममागे ९० रुपयांनी वाढून २५,७४० रुपये झाले. सोन्याप्रमाणे चांदीही वधारली.

नवी दिल्ली : सलग दोन दिवस घसरण झाल्यानंतर सोन्याला लग्नाच्या मोसमाची चाहूल लागली असून मंगळवारी ते सावरले. सोन्याचे भाव १० ग्रॅममागे ९० रुपयांनी वाढून २५,७४० रुपये झाले. सोन्याप्रमाणे चांदीही वधारली.२३ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह होता. भारतात साधारणपणे तुलसी विवाहापासून लग्नाचा मोसम सुरू होतो. या मोसमाची चाहूल लागताच सोने व्यापाऱ्यांनी नव्याने जोरदार खरेदी केली. त्यांना जागतिक स्तरावरही पाठबळ मिळाले. त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला. सोन्याप्रमाणेच चांदीही ३५० रुपयांनी वधारली. औद्योगिक प्रकल्प आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदीचे भाव ३४,१५० रुपये प्रतिकिलो झाले.आता लग्नाच्या निमित्ताने सोन्याला मागणी वाढणार आहे. ही बाब ध्यानात घेऊन व्यापाऱ्यांनी सोने खरेदी सुरू केली आहे. त्यातच जागतिक बाजारातही आज सोन्याला चांगला भाव मिळाला, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.सोन्याच्या भावाला सिंगापूर मार्केट निश्चित करते. तेथे सोन्याचे भाव ०.३ टक्क्यांनी वाढून १,०७२.७२ अमेरिकी डॉलर प्रति औंस असे झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव १० ग्रॅममागे ९० रुपयांनी वाढून अनुक्रमे २५,७४० रुपये आणि २५,५९० रुपये असे झाले. गेल्या दोन दिवसात सोने २५० रुपयांनी घसरले होते. चांदीच्या नाण्याचे खरेदीचे भाव ४८ हजार रुपये, तर विक्रीचे भाव ४९ हजार रुपये होते.