नवी दिल्ली - देशामध्ये डिजिटलायझेशनसोबतच ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या सर्वाधिक घटना मोबाईलच्या क्यूआर कोडवरून झाल्या आहेत. आजकाल फसवणूक करणारे लोकांच्या बँक खात्यातून या तंत्राद्वारे पैशांची लूट करीत आहेत. असे फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 44 कोटींहून अधिक ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने म्हटले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून क्यूआर कोड (QR code) मिळाला तर तो चुकूनही स्कॅन करू नका. यातून आपल्या खात्यातून चोरी होऊ शकते, असं सांगितलं आहे.
एसबीआयने एक ट्विट करुन ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी तुम्ही युपीआय पेमेंट करता तेव्हा त्यावरील सुचना नीट वाचायला हव्यात.
काय असतो क्यूआर कोड ?
क्यूआर कोडमध्ये काही ‘एनक्रिप्टेड’ माहिती आहे. त्यात फोन नंबर, वेबसाईटची लिंक, अॅपची डाऊनलोड लिंक असू शकते. ही माहिती डिक्रिप्ट करण्यासाठी, ती स्कॅन करावी लागेल. तो क्यूआर कोड स्कॅन करताच, तो कोड मजकुराच्या स्वरूपात तुमच्यासमोर उघडतो.
क्यूआर कोडने कसा होतो फ्रॉड?
एसबीआयने सांगितले की क्यूआर कोड नेहमी पैसे देण्यासाठी वापरला जातो पैसे घेण्यासाठी नव्हे. म्हणून, पैसे मिळवण्याच्या नावाखाली कधीही क्यूआर कोड स्कॅन करू नका. यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते.
अशी खबरदारी घ्यावी
- युपीआय पिन फक्त मनी ट्रान्सफरसाठी आवश्यक आहे, पैसे मिळवण्यासाठी नाही.
- पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी मोबाईल नंबर, नाव आणि युपीआय आयडीची तपासणी करा.
- युपीआय पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका.
- पैसे पाठवण्यासाठी स्कॅनरचा योग्य वापर करावा.
- अधिकृत पद्धतीने आपल्या शंकेचे निरसन करा. इतरांकडून आपल्या समस्येवर पर्याय शोधू नका.
- कोणत्याही पेमेंट किंवा तांत्रिक समस्यांसाठी अॅपच्या मदत विभागाचा वापर करा आणि कोणत्याही समस्येबाबत बँकेच्या तक्रार निवारण पोर्टल https://crcf.sbi.co.in/ccf/ वर जात संपर्क साधा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.