मुंबई : सध्या देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थिती बँकिंग फसवणुकीच्या (Banking Fraud) घटनांमध्ये सुद्धा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या 44 कोटी ग्राहकांना सायबर भामट्यांपासून वेळोवेळी सतर्क करत आहे. नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहकांना फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे. (sbi alert warns customers about fake customer care numbers)
एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. खोट्या कस्टमर केअर नंबरपासून सावध रहा. एसबीआयच्या अडचणी किंवा सेवांच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील क्रमांकावरच संपर्क करा. याशिवाय, बँकेच्या खात्याची माहिती कोणासोबतही शेअर करू नका, असे एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Beware of fraudulent customer care numbers. Please refer to the official website of SBI for correct customer care numbers. Refrain from sharing confidential banking information with anyone.#CyberSafety#CyberCrime#Fraud#BankSafe#SafeWithSBIpic.twitter.com/Q0hbUYjAud
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 18, 2021
याचबरोबर, बँकेने ट्विटसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती बनावट कस्टमर केअर नंबरवर फोनवर कॉल करतो, ज्यात फसवणूक करणाऱ्याकडून सर्व माहिती घेऊन अकाउंटचे उल्लंघन केले जाते. व्हिडीओच्या शेवटी असे म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. तुम्ही report.phising@sbi.co.in किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 वर कॉल करू शकता.
मोफत भेटवस्तूंच्या नावाखाली फसवणूक
अलीकडेच, एसबीआयने ग्राहकांना मोफत भेटवस्तूंच्या नावाखाली फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. बँकेने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले होते की फसवणूक करणारे ग्राहकांना मोफत भेटवस्तूच्या नावावर लिंक पाठवून त्यांचे वैयक्तिक तपशील चोरत आहेत.