Join us

एक क्लिक आणि खातं साफ; इशारा देत SBI म्हणाली...

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 2:08 PM

सावध राहण्याचा बँकेनं दिला इशारा

ठळक मुद्देआपली वैयक्तिक माहिती कोणालाही न देण्याचं बॅकेचं आवाहनसावध राहण्याचा बँकेनं दिला इशारा

इंटरनेटमुळे सर्व सोयी मिळाल्या आहेत, जगही जवळ आलंय आणि आपलं कामही सोपं झालंय. पण इंटरनेटचे जसे फायदे आहेत, तसे त्याचे तोटेही आहेत. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती काही जणांना आली असेल. इतकंच काय तर अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं खातही पूर्णपणे रिकामं होऊ शकतं. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं देशातील आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. तसंच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहनही केलं आहे. असं केल्यास तुम्ही आपल्या मेहनतीची कमाईदेखील गमावू शकता.बँकेनं आपल्या ग्राहकांना त्वरित कर्ज देणाऱ्या अॅप पासून सावध राहण्यास सांगितलं आहे. तसंच घाईघडबडीत कर्ज घेणं धोकादायक ठरू शकतं असंही म्हटलं आहे. यातून वाचण्यासाठी बँकेनं काही सुरक्षेच्या सूचनाही केल्या आहेत. अशा कोणत्याही अॅपचा वापर न करण्याच्या सूचनाही बँकेनं केल्या आहे. या अॅपद्वारे कर्ज देण्याच्या बहाण्यानं ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यांना अधिक व्याजदरावरही कर्ज देण्यात येतं. या अॅपद्वारे जवळपास ३५ टक्के दरानं कर्ज देण्यात येतं.अशा अॅप्सपासून सावध राहण्यासाठी स्टेट बँकेनं काही सूचनाही केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यापूर्वी नियम आणि अटी पूर्णपणे वाचल्या पाहिजेत. तसंच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसंच अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यताही पडताळून पाहा. तसंच कोणत्याही आर्थिक मदतीसाठी  https://bank.sbi यावर जाऊन मदत घेण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे.  तात्काळ कर्ज देणारी अॅप ग्राहकांकडून कर्जाच्या नावावर मोठी रक्कम वसूल करतात. लॉकडाऊन दरम्यान अनेकांसोबत असे प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती. काही जणांना रक्कम फेडता आली नाही त्यावेळी त्यांच्याकडून धमकीचे फोनही करण्यात येत होते. अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी बँकेनं सावध राहण्यास सांगितलं आहे. तसंच आपली वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये असंही बँकेनं म्हटलं आहे. तसंच आपला एटीएम पिन, कार्ड नंबर, अकाऊंट नंबर आणि ओटीपी कोणासोबतही शेअर न करण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे. 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाबँकऑनलाइनपैसा