नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्सवर गंभीर संकट असताना सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या(SBI) अध्यक्षांचे विधान समोर आले आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांना जवळपास 27 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले. हे बँकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या 0.88 टक्के आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, बँकेने शेअर्सच्या बदल्यात या समूहाला कोणतेही कर्ज दिलेले नाही.
दरम्यान, अदानी समूहाच्या शेअर्सवर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, एसबीआयने अदानी समूहाला सर्वाधिक कर्ज दिल्याचे सांगितले जात होते. एसबीआयच्या तिमाही निकालांच्या घोषणेच्या निमित्ताने दिनेश खारा म्हणाले की, अदानी समूहाच्या प्रकल्पांना कर्ज देताना फिजिकल अॅसेट (भौतिक मालमत्ता) आणि कॅश फ्लो (रोख प्रवाह) लक्षात ठेवण्यात आला आहे. तसेच, या समूहाची हिस्सेदारीआमच्या एकूण कर्जाच्या 0.88 टक्के आहे. बँकेचे असे मत नाही आहे की, अदानी समूह आपल्या कर्ज देयांची पूर्तता करण्यात कोणत्याही आव्हानाचा सामना करत आहे.
"आम्ही शेअर्सवर कर्ज दिलेले नाही. आमच्याकडे असा कोणताही पोर्टफोलिओ नाही. आम्ही कोणत्याही आर्थिक दायित्वासाठी किंवा अधिग्रहणासाठी कोणतीही हमी दिलेली नाही. या सर्व कामगिरी-आधारित किंवा आर्थिक हमी आहेत. आम्हाला चिंता वाटेल असे काहीही आम्ही केलेले नाही", असे दिनेश खारा म्हणाले. दरम्यान, सध्याच्या घडामोडी पाहता अदानी समूहासोबतच्या व्यवहाराच्या पद्धतीत काही बदल होण्याची शक्यता विचारली असता दिनेश खारा म्हणाले की, कर्जाची रक्कम जारी करण्यापूर्वी बँक नेहमी योग्य इक्विटीचा आग्रह धरते.
याचबरोबर, दिनेश खारा म्हणाले, "जोपर्यंत इक्विटी दिसत नाही, तोपर्यंत पैसे निघत नाहीत. आम्ही कोणत्याही इक्विटीची वाट पाहत आहोत असे नाही. भविष्यातही कोणताही प्रस्ताव त्याच्या गुणवत्तेच्या आधारे तपासला जाईल. यावर क्रेडिट समित्या निर्णय घेतात. अदानी समूहाच्या समभागांच्या मोठ्या घसरणीमुळे कर्ज देणाऱ्या संस्थांवर परिणाम होईल, या भीतीने समूहाने कर्जाचे पुनर्वित्त करण्याची कोणतीही विनंती केलेली नाही. यासोबतच या समूहाचा थकीत कर्ज फेडण्याचा विक्रमही चांगला आहे."