मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या कर्जाच्या व्याजदरात १0 आधार अंकांची कपात केली आहे. एप्रिलनंतर बँकेने केलेली ही पाचवी व्याजदर कपात ठरली आहे. या पाच दरकपातीनंतर एसबीआयचा कर्जाचा व्याजदर आता ४0 आधार अंकांनी कमी झाला आहे.
बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, आगामी सणासुदीच्या काळाचा लाभ उठविणे, तसेच अतिरिक्त तरलतेचा (एक्सेस लिक्विडिटी) वापर करणे यासाठी ही व्याजदर कपात करण्यात आली आहे. नवे व्याजदर मंगळवारपासून लागू होणार आहेत.
या कपातीनंतर एक वर्षाच्या सीमांत खर्चावर (मार्जिनल कॉस्ट) आधारित व्याजदर ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के होईल. एमसीएलआर या लघू नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘सीमांत खर्चाधिष्ठित व्याजदरा’वरच सर्व किरकोळ कर्जांचे व्याजदर अवलंबून असतात. ८.१५ टक्के एमसीएलआर हा उद्योगात सर्वाधिक कमी आहे.
एसबीआयने बहुतांश सर्व कर्ज व ठेवींचे व्याजदर आता रेपोदराशी जोडले आहेत. बँकेने आपल्या किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरांत २0 ते २५ आधार अंकांची कपात केली आहे, तसेच मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरांत १0 ते २0 आधार अंकांची कपात केली आहे. ठेवींवरील नवे दरही मंगळवारपासून लागू होतील.
बँकेने म्हटले की, घसरते व्याजदर आणि अतिरिक्त तरलता यामुळे कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरांत कपात केली जात आहे. बँकेने एप्रिलमध्ये ५ आधार अंकांची कपात केली होती, तेव्हा एमसीएलआर ८.५५ टक्के होता. त्यानंतर, मे आणि जुलैमध्ये त्यात कपात करण्यात आली. आॅगस्टमध्ये मोठी १५ आधार अंकांची कपात करण्यात आल्यानंतर एमसीएलआर ८.२५ टक्क्यांवर आला होता. आता ताज्या कपातीनंतर तो ८.१५ टक्क्यांवर येईल.