तुमची बचत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवून तुम्हालाही बंपर नफा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेनं १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी, २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी आणि ५ वर्षे ते १० वर्षे वगळता सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेले नवीन व्याजदर २७ डिसेंबर २०२३ पासून लागू होतील.
वाढलेले व्याजदर
व्याजदरातील या वाढीनंतर, एसबीआयनं ७ दिवस ते ४५ दिवसांच्या एफडीवर ५० बेसिस पॉईंट्स वाढवून ३.५० टक्के, ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवर २५ बेसिस पॉईंट्स वाढवून ४.७५ टक्के, १८० दिवस ते २१० दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करून ५.७५ टक्के, २११ दिवसांपासून १ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून ६ टक्के आणि ३ वर्षांपासून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून व्याजदर ६.७५ टक्के केले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना आणखी फायदा
दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना आणखी दिलासा दिला आहे. व्याजदरातील वाढीनंतर त्यांना ५० बेसिस पॉईंट्स अधिक व्याजदर मिळणार आहे. याचा अर्थ आता एसबीआय आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीसाठी ४ टक्के ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देईल. यापूर्वी एसबीआयनं फेब्रुवारी महिन्यात एफडीचे दर बदलले होते.