नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने कर्जावरील व्याजदर वाढवून आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर सर्वच बँकांचे व्याजदर वाढणार हे निश्चित झाले होते. याआधी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी आपले व्याजद वाढवले होते. आता एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
एसबीआयच्या वेबसाईटनुसार सर्व टेन्योर असलेल्या लोनच्या व्याजदरांमध्ये २५ आधारभूत अंकांनी वाढ केली आहे. आता बँकांचे एक वर्षाचे एमसीएलआर वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचले आहे. बँका आपल्या होम, ऑटोसह बहुतांश लोनचे व्याजदर एमसीएलआरच्या आधारावर निश्चित करत असतात. याआधी आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ करून रेपो रेट ६.२५ टक्के एवढा केला होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर आठवडाभरातच एसबीआयने आपलं कर्ज महाग केलं आहे.
बँकेने कमी कालावधीच्या कर्जावरील व्याजदरही वाढवले आहेत. यामध्ये ओव्हरनाईटपासून ६ महिन्यांपर्यंतच्या कर्जांचा समावेश आहे. टेन्योरच्या कर्जाचा एमसीएलआर आता ७.८५ टक्क्यांपासून ते ८.३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याशिवाय दोन वर्षांपर्यंतच्या कर्जाचा कॉस्ट बेस्ड लँडिंग रेट ८.५० टक्के झाला आहे. तर तीन वर्षांच्या कर्जाचा दर हा ८.६० टक्क्यांवर पोहोचला आहे.
एसबीआयने यावर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत एमसीएलआरमध्ये १.१० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये डिसेंबरमध्ये वाढवलेल्या ०.२५ टक्के व्याजदराचा समावेशही आहे. बँकेकडून वाटण्यात आलेले ७५ टक्के लोन फ्लोटिंग इंट्रेस्ट रेट लागू होतात. यामध्येही ४१ टक्के लोन आता एमसीएलआरशी जोडले गेले आहेत. उर्वरित ५९ टक्के कर्जावर बाहेरील बेंचमार्क रेट लागू होतात. बाहेरील बेंचमार्क याचा अर्थ रेपो रेट किंवा ट्रेजरी बिल रेपो रेटपासून, एमसीएलआर बँकेच्या अंतर्गत खर्चाशी संबंधित असते.