नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँकएसबीआयने (SBI) ग्राहकांना नवीन वर्षात भेट दिली आहे. नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे आयएमपीएस (IMPS) ट्रान्सफरवर आता चार्ज आकारले जाणार नाही. मात्र, बँकेच्या शाखेतून IMPS ट्रान्सफर चार्ज शिवाय होणार नाही.
एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, शाखेत जाऊन IMPS द्वारे 2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्फरवर आधीच आकारलेले चार्ज कायम राहील. तसेच, बँकेने म्हटले आहे की शाखेतून 2 लाख रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत IMPS ट्रान्सफरवर 20 रुपये आणि GST चार्ज द्यावा लागेल. हा नियम 01 फेब्रुवारी 2022 पासून लागू होईल. मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा YONO अॅपद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS ट्रान्सफरसाठी बँक कोणतेही चार्ज आकारणार नाही.
एसबीआय शाखेतून 1,000 रुपयांपर्यंत IMPS ट्रान्सफरसाठी कोणतेही चार्ज लागत नाही. दुसरीकडे, 1 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरवर 2 रुपये आणि जीएसटी, 10 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरवर 4 रुपये आणि जीएसटी, 1 लाख रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरवर 12 रुपये आणि जीएसटी चार्ज म्हणून आकारले जाते.
रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबरमध्ये वाढवली मर्यादाIMPS हा पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशीही ते 24 तास उपलब्ध असते. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच IMPS ट्रान्सफर मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2021 मध्ये हा बदल केला. यानंतर, सर्व बँकांना 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या नवीन स्लॅबसाठी चार्ज निश्चित करणे आवश्यक होते.
डिजिटल बँकिंगमध्ये RTGS आणि NEFT ट्रान्सफरसाठी कोणतेही चार्ज नाहीIMPS व्यतिरिक्त, SBI YONO कडून नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा RTGS आणि NEFT ट्रान्सफरसाठी कोणतेही चार्ज आकारत नाही. मात्र, शाखेतून RTGS आणि NEFT ट्रान्सफर मोफत नाही. RTGS ट्रान्सफरच्या बाबतीत 2 लाख रुपये ते 5 लाख रुपयांसाठी 20 रुपये आणि जीएसटी, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफरसाठी 40 रुपये आणि जीएसटी चार्ज आकारला जातो. NEFT ट्रान्सफरच्या बाबतीत, हे चार्ज 2 रुपये ते 20 रुपये आणि जीएसटीदरम्यान आहेत.