नवी दिल्ली : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि योनो एसबीआय (YONO SBI) ॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही एसबीआयच्या योनो ॲपद्वारे हॉटेल्स आणि होम स्टे बुक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात सवलत मिळू शकते. योनो ॲपने मेकमायट्रिपच्या (MakeMyTrip) सहकार्याने ही ऑफर आणली आहे.
या ऑफरची माहिती एसबीआयने पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, जर ग्राहकांनी योनो ॲपद्वारे हॉटेल्स किंवा होम स्टे बुक केले आणि एसबीआय कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे भरले तर त्यांना बुकिंगवर 12 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. ही सूट 5 हजार रुपयांपर्यंत असू शकते. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
असे करू शकता बुकिंग
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला योनो ॲपद्वारेच बुकिंग करावे लागेल. यासाठी सर्वात आधी योनो ॲपवर (YONO App) लॉगिन करावे लागेल. यानंतर बेस्ट ऑफर्स (Best Offers) या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. हे केल्यानंतर MakeMyTrip वर क्लिक करावे लागेल. नंतर प्रोमोकोड MMTSBI टाकून तुमचे बुकिंग करू शकता. तुम्हाला 12 टक्के सूट मिळू शकते.
नियम आणि अटी लागू
या ऑफरसोबत काही नियम आणि अटी देखील जोडल्या आहेत. या ऑफरचा लाभ घेणाऱ्यांना त्या स्वीकाराव्या लागतील. त्यामुळे, ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी तुम्ही अटी आणि शर्ती सविस्तर वाचणे महत्त्वाचे आहे. त्यांची माहिती ॲपवर ऑफर्ससह देण्यात आली आहे.
योनो ॲपचे फायदे...
योनो हे एसबीआयचे लोकप्रिय ॲप आहे. यावर अनेक सेवा उपलब्ध आहेत. एसबीआयच्या जवळपास सर्व बँकिंग सेवा या ॲपवर उपलब्ध आहेत. या ॲपचा वापर करून लोक सहजपणे आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. या ॲपवरून हॉटेल बुकिंग, फ्लाइट तिकीट बुकिंग करता येते तसेच ऑनलाइन शॉपिंगही करता येते. या ॲपच्या मदतीने एसबीआयकडून कर्ज घेता येते. तसेच, एसबीआयने हे ॲप लाँच करून बँकिंग खूप सोपे केले आहे. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांची रांगेत उभे राहण्याची सुटका झाली आहे.