महागाईने अक्षरश: लोकांचे कंबरडे मोडले आहे. महागाई वाढली तसे उत्पन्न वाढलेले नाहीय. यामुळे लोकांना पदरचे साठविलेले पैसे बाहेर काढून खर्च करावे लागत आहेत. काही महिन्यांपूर्वी ९ लाख कोटी रुपयांचे सेव्हिंग लोकांनी मोडले असल्याचे वृत्त आले होते. तरी महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यातच एसबीआयचा महागाईवर खळबळ उडवून देणारा अहवाल आला आहे.
येत्या काही महिन्यांत महागाईचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे यात म्हटले आहे. जुलैमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर जवळपास 5 वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. परंतू, जूनच्या तुलनेत महागाईत कोणतीही घट झालेली नाही. किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये 3.54% झाला, गेल्या वर्षी तो 7.44% होता. अन्न धान्यातील नरमाईचा यावेळी फायदा झाला.
एसबीआयच्या इकोरॅपने अहवाल जारी केला आहे. प्रमुख धान्य उत्पादक राज्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. तसेच ला निनाच्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडू शकतो. यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकतो. यामुळे अन्न धान्यावर परिणाम होऊन आर्थिक वर्ष २०२५ मध्ये चलनवाढीचा दर हा ४.५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. यामुळे लोकांना आणखी काही प्रमाणात खिसा मोकळा करावा लागणार आहे.
देशाच्या अनेक भागात तुफान पाऊस झाला आहे, तर काही भागात कमी पाऊस झालेला आहे. पंजाब, हरियाणात पुरेसा पाऊस झालेला नाही. गंगाकाठच्या भागातही पाऊस कमी झाला आहे. देशात सरासरीपेक्षा ६ टक्के जास्त पाऊस झालेला आहे. चांगला पाऊस होईल म्हणून यावर्षी ६ टक्के जास्त पेरण्या झालेल्या आहेत. परंतू २०२२ च्या तुलनेत डाळींची पेरणी ६.२ टक्क्यांनी कमीच झालेली आहे. गेल्या १४ महिन्यांपासून डाळीचा महागाई दर हा १० टक्क्यांवर राहिलेला आहे. यामुळे ही चिंतेची बाब असल्याचे केअरएजच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ रजनी सिन्हा यांनी म्हटले आहे.
कच्चे तेलही महागण्याची शक्यता...गेल्याा सहा महिन्यांत कच्चे तेल ८० डॉलरवर आले आहे. परंतू आंतरराष्ट्रीय तणाव पाहता ते या वर्षाच्या अखेरीस ८५ ते ९० डॉलरवर जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेने वर्तविला आहे. यामुळे महागाईला आणखी वाव मिळण्याची शक्यता आहे.