मुंबई : एसबीआयने नववर्षाच्या आधीच ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आज गृह कर्जावरील एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड रेट (ईबीआर) मध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. यामुळे हा दर 7.80 टक्के झाला आहे. यामुळे गृहकर्ज स्वस्त झाले असून नवीन दर 1 जानेवारीपासीन लागू होणार आहे.
एसबीआयचा गृहकर्जावरील व्याजदर सध्या 8.15 टक्के होता. आता तो 7.90 टक्क्यांवर येणार आहे. या कपातीचा फायदा केवळ गृह कर्ज घेणाऱ्य़ांनाच नाही तर एमएसएमईमध्ये ईबीआर लिंक्ड कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनाही लाभ होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट पेक्षा (5.15 टक्के) एसबीआय ईबीआर रेट 265 पॉईंट जास्त ठेवते. तसेच ग्राहकांना त्यापेक्षा जास्त 10 ते 75 बेसिस पॉईंटनी व्याज आकारते. म्हणजेच जर ईबीआरचा दर 7.80 टक्के असेल तर त्यापेक्षा जास्त 0.10 ते 0.75 टक्के व्याज ग्राहकांना द्यावे लागणार आहे. यामुळे नव्या ग्राहकांना एसबीआयचे गृह कर्ज 7.90 टक्के ते 8.65 टक्क्यांपर्यंत मिळणार आहे.
गृह कर्जाच्या व्याजात कमालीची कपात करण्यात येणार असल्याचे संकेत एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक पी के गुप्ता यांनी दिले होते. एका हिंदी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे संकेत दिले आहेत. एसबीआय गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करणार आहे. सध्या हा व्याजदर 8.15 टक्के आहे. या कर्जांचा थेट रेपो रेटसोबत संबंध जोडण्यात येणार असल्याने हे शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला तरीही बँका त्याचा फायदा ग्राहकांना देत नव्हत्या. आरबीआयने दट्ट्या आणल्यानंतर बँका हा फायदा गेल्या काही महिन्यांपासून देत आहेत. यामध्ये एसबीआयचा पहिला क्रमांक असतो.
येत्या 1 जानेवारीपासून गृह कर्जापासून सर्व उत्पादने ही रेपो रेटशी थेट जोडली जाणार आहेत. अनेक वर्षांनंतर ही प्रक्रिया लागू होणार आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना 8 टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे 1 जानेवारीपासून ग्राहकांना 7.90 टक्के दराने व्याजदाराचा लाभ मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची सुरूवात 1 जानेवारीपासून होत आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.