Join us  

घोटाळा ‘क्वांट’चा; फटका ‘क्वांटम’ला; ‘तो मी नव्हेच’ असे म्हणायची कंपनीवर वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 6:50 AM

 ‘तो मी नव्हेच’ असे म्हणायची कंपनीवर वेळ; करावा लागला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘फ्रंट-रनिंग घोटाळ्याच्या आरोपात सेबीमार्फत चौकशी सुरू असलेल्या ‘क्वांट म्युच्युअल फंड’ कंपनीमुळे ‘क्वांटम म्युच्युअल फंड’ कंपनीस मोठा फटका बसला असून, ‘तो मी नव्हेच’ असे म्हणायची वेळ या कंपनीवर आली आहे. चौकशी सुरू असलेली ‘क्वांट’ कंपनी वेगळी असून, आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही, असे ‘क्वांटम’ने खुलाशात म्हटले आहे.दोन्ही कंपन्यांची नावे सारखीच असल्यामुळे हा घोळ झाला आहे. संदीप टंडन यांच्या नेतृत्वाखालील ‘क्वांट म्युच्युअल फंड’ कंपनीच्या कार्यालयांवर सेबीने धाडी टाकल्या आहेत. कारवाईनंतर ‘क्वांटम म्युच्युअल फंड’ कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला. लोक आपले फंड काढून घेऊ लागले आहेत.

काय आहे ‘क्वांट’चा फ्रंट-रनिंग घोटाळा? आगामी काळात होणाऱ्या मोठ्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या अंतर्गत माहितीचा वापर स्वत:च्या लाभासाठी करण्याच्या प्रकारास ‘फ्रंट-रनिंग’ असे म्हटले जाते. क्वांटशी संबंधित काही लोकांनी ‘फ्रंट-रनिंग’चा वापर करून काही व्यवहार केल्याचे समोर आले आहे. यातून २० कोटी रुपयांचा नफा कमावण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

आम्ही नामसाधर्म्याचे बळी ठरलो आहोत... ‘क्वांटम म्युच्युअल फंड’ कंपनीने म्हटले की, ‘आम्ही नामसाधर्म्याचे बळी ठरलो आहोत. सेबी चौकशी करीत असलेली ‘क्वांट म्युच्युअल फंड’ कंपनी वेगळी आहे. आमच्या कंपनीचे नाव ‘क्वांटम म्युच्युअल फंड’ असे आहे. दोन्ही कंपन्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. आमची कंपनी जुनी आहे. आमची कंपनी स्थापन झाल्यानंतर १२ वर्षांनी ‘क्वांट’ कंपनी सुरू झाली.

‘क्वांटम’ने म्हटले की, आमची कंपनी जुनी असल्यामुळे ‘क्वांट म्युच्युअल फंड’ कंपनीला आमच्या कंपनीच्या नावासारखे नाव वापरण्यास बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित आहे.

टॅग्स :सेबी