Lokmat Money > बिझनेस न्यूज > क्रेडिट कार्डधारकांच्या खर्चाला बँकांकडून कात्री; मर्यादा ४० ते ९० टक्क्यांनी केली कमी

क्रेडिट कार्डधारकांच्या खर्चाला बँकांकडून कात्री; मर्यादा ४० ते ९० टक्क्यांनी केली कमी

आता कोरोनामुळे कोसळणाऱ्या आर्थिक संकटाची धार अधिक वाढत असल्याने आणखी काही बँकांनी क्रेडिटला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:58 AM2020-05-06T02:58:31+5:302020-05-06T07:12:55+5:30

आता कोरोनामुळे कोसळणाऱ्या आर्थिक संकटाची धार अधिक वाढत असल्याने आणखी काही बँकांनी क्रेडिटला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे

Scissors from banks to credit cardholders' expenses; Reduced the limit by 40 to 90 percent | क्रेडिट कार्डधारकांच्या खर्चाला बँकांकडून कात्री; मर्यादा ४० ते ९० टक्क्यांनी केली कमी

क्रेडिट कार्डधारकांच्या खर्चाला बँकांकडून कात्री; मर्यादा ४० ते ९० टक्क्यांनी केली कमी

संदीप शिंदे 

मुंबई : कोरोना संकटामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय बंद झाला आहे. गेल्या दीड महिन्यात एक रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे या महिन्यातील बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड कामी येईल, असा व्यावसायिक संदीप वेंगुर्लेकर यांचा विचार होता. मात्र, बँकेने त्यांच्या क्रेडिटची मर्यादा मासिक दीड लाख रुपयांवरून थेट सात हजार रुपये करून मोठा धक्का दिला आहे. जेव्हा सर्वाधिक गरज आहे तेव्हाच लावलेल्या या कात्रीमुळे केवळ वेंगुर्लेकरच नव्हे तर विविध बँकांचे हजारो क्रेडिट कार्डधारक धास्तावले आहेत.

मला बँकेने एक लाख रुपयांपर्यंत मर्यादा दिली होती, ती आता ३० हजार रुपये झाल्याचा मेसेज मोबाइलवर आल्याचे विनीत मयेकर यांनी सांगितले. तर, ८० हजारांपर्यंत क्रेडिट मर्यादा असलेल्या शीतल म्हात्रे यांना आता फक्त १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्याची मुभा आहे. कोरोना संकटामुळे प्रत्येकाच्याच खिशाला झळ बसली आहे. अनेकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. वेतन कपातीचा फटका जवळपास प्रत्येकालाच बसणार आहे. त्याशिवाय सर्वच प्रकारचे उद्योजक आणि व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

या आर्थिक अरिष्टाच्या काळात पैशांची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. परंतु, या खर्च केलेल्या पैशांचा परतावा मासिक तत्त्वावर ग्राहकांकडून येईलच याची शाश्वती अनेक बँकांना नाही. त्यामुळे ज्या बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांनी कोणताही धोक न पत्करता आपल्या ग्राहकांच्या क्रेडिट मर्यादेत कपात करण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला. १५ एप्रिलपासून त्यांनी ही कपात लागू केली. त्यात माजी सरकारने कृपाछत्र धरल्याने वादग्रस्त ठरलेल्या बँकेसह आणखी एका बँकेचा समावेश होता.

आता कोरोनामुळे कोसळणाऱ्या आर्थिक संकटाची धार अधिक वाढत असल्याने आणखी काही बँकांनी क्रेडिटला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. ही कात्री ४० ते ९० टक्क्यांपर्यंत असल्याच्या वृत्ताला दोन बँकांच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला आहे. मात्र, बँकेसह स्वत:चे नावही प्रसिद्ध करण्यास त्यांनी नकार दिला.

ग्राहकांच्या अडचणीत भर
अनेकांची महावितरण, सोसायटी मेंटेनन्स, महानगर गॅस आदींची मासिक बिले क्रेडिट कार्डच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सिस्टीम (ईसीएस) द्वारे अदा होतात. क्रेडिट मर्यादा कमी केल्याने ती बाऊन्स झाली. आता त्यासाठीचा भुर्दंडही सोसावा लागणार आहे. लॉकडाउनमुळे बँकांची कस्टमर केअर सेंटर्स बंद आहेत. त्यामुळे क्रेडिट मर्यादा का कमी केली, याबाबतचे कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याची या ग्राहकांची तक्रार आहे. वेंगुर्लेकर यांनी बराच प्रयत्न केल्यानंतर बँकेच्या धोरणानुसार मर्यादा कमी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचे सबळ कारण देण्यास बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने असमर्थता दर्शवल्याचे वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

Web Title: Scissors from banks to credit cardholders' expenses; Reduced the limit by 40 to 90 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.