Join us

दोन हजाराची नोट बंद होणार? आरबीआयनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 10:04 AM

सणासुदीच्या तोंडावर बाजारातील रोख कमी होत असल्याची चर्चा

नवी दिल्ली: उत्सव काळात रोख रकमेची सर्वाधिक आवश्यकता असते. मात्र नेमक्या याच काळात रोख रकमेची टंचाई जाणवू शकते, अशी माहिती समोर येत आहे. दोन हजारांच्या नोटा बँकांकडून एटीएममध्ये भरल्या जात नसल्याचं वृत्त चर्चेत आल्यानं ग्राहकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं याची सुरुवात केल्याचं वृत्तदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन एसबीआय लहान शहरांमधील एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटांचे स्लॉट हटवत असल्याचं वृत्त काही दिवसांपासून चर्चेत होतं. दोन हजार रुपयांच्या नोटांचे स्लॉट हटवून त्याऐवजी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे स्लॉट्स वाढवले जात असल्याच्या वृत्तामुळे सर्वसामान्य जनता चिंतेत होती. मात्र आरबीआय मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनदेखील त्यांनी केलं. आरबीआय २ हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं होतं. अशा प्रकारचे कोणतेही आदेश आरबीआयनं बँकांना दिले नसल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. एसबीआयच्या एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटांचे स्लॉट्स काढले जात असल्याचं वृत्त साफ चुकीचं असल्याचंदेखील ते म्हणाले. आरबीआयनं अशा प्रकारचे आदेश दिल्यास त्याबद्दलची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. त्यामुळे लोकांनी चिंता करू नये असं आवाहन त्यांनी केलं. दोन हजाराच्या नोटा चलनात आहेत आणि यापुढेही कायम राहतील, असं आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. याची माहिती आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :एटीएम