नवी दिल्ली : कच्च्या तेलाचा सुरळीत पुरवठा निश्चित करण्यासाठी भारताकडून पर्यायी स्रोत शाेधण्यात येणार आहे. मात्र, त्याचा कच्च्या तेलाच्या दरांवर परिणाम हाेणार नाही. इंधन दरवाढीचा अर्थव्यवस्था आणि ग्राहकांवर हाेणाऱ्या परिणामांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
सीतारामन यांनी सांगितले, की अन्नधान्य महागाईवर सरकारचे पॅनल लक्ष ठेवून आहे. वातावरणातील बदल तसेच पिकबदलांमुळे पुरवठ्यावर हाेणाऱ्या परिणामांवरही उपाययाेजना करण्यात येत आहेत. अर्थव्यवस्थेत सातत्याने सुधारणा हाेत असून सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सीतारामन म्हणाल्या. अर्थव्यवस्थेला पुन्हा धक्का बसण्याचा धाेका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
काेराेनाची वाढती रुग्णसंख्या सरकार आणि खासगी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय असल्याचे सांगतानाच लसींबाबत भारताची स्थिती दिलासादायक असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्यासाठी सरकार उपाययाेजना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.