Join us

SEBI मध्ये घडतंय काय? हिंडनबर्गचं 'टार्गेट' माधबी पुरी बुच यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू केल्याची कुणकुण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:19 PM

यापूर्वी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते.

Madhabi Puri Buch News : सरकारनं सेबीच्या नव्या प्रमुखाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती समोर आलीये. नवे प्रमुख सेबीच्या (SEBI) विद्यमान अध्यक्ष माधवी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांची जागा घेतील. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सात ते दहा दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. 

सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. मनीकंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) या २ मार्च २०२२ रोजी सेबीच्या प्रमुख झाल्या. सेबी प्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. त्यांचा यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपत आहे. अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी बुच एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ अशी पाच वर्षे सेबीच्या पूर्णवेळ सदस्या होत्या.

लवकरच अर्ज मागवण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहता बुच (Madhabi Puri Buch) यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या पर्यायावर सरकार विचार करते की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सेबीच्या प्रमुखपदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची औपचारिक प्रक्रिया काही आठवड्यांत सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बुच यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही या प्रकरणाशी संबंधित काही सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, अर्थमंत्रालय आणि सेबीच्या प्रवक्त्यांकडून यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नसल्याचं मनीकंट्रोलनं म्हटलंय. याशिवाय बुच यांना वेळेपूर्वीच हटवलं जाऊ शकतं, अशा शक्यतांनाही सूत्रांनी नकार दिला. तर एका सूत्रानं कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्या आपल्या पदावर कायम राहू शकतात अशी शक्यता व्यक्त केली.

अनेक आरोपांचा करावा लागलेला सामना

बुच यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले आहेत. सर्वप्रथम अमेरिकेची शॉर्ट सेल फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाशी संबंधित ऑफशोर फंडांमध्ये बुच यांच्या गुंतवणुकीचा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसनं त्यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अखेर सेबीच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटानं कामाच्या ठिकाणातील कामाच्या खराब वातावरणासाठी त्यांना जबाबदार धरलं. मात्र, आता हे प्रकरण मिटलं आहे. बुच यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं. दरम्यान, संसदेच्या लोकलेखा समितीने (पीएसी) सेबीच्या कामकाजाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सेबी प्रमुखांना चौकशीसाठीदेखील बोलावलंय.

टॅग्स :सेबीमाधबी पुरी बुच