Join us

माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 4:09 PM

Sebi Employees Protest News: माधबी पुरी-बुच यांच्या राजीनाम्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.

SEBI Employees Protest : सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या राजीनाम्यासाठी शेकडो संतप्त सेबी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी सेबी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह अर्थ मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केलेले विधान मागे घण्याची मागणी केली. त्या पत्रात माधबी पुरी बुच यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीसाठी बाह्य शक्तींना जबाबदार धरण्यात आले होते.

बुधवारी सेबीने कर्मचाऱ्यांची नाराजी आणि कार्यालयातील खराब वातावरणाबाबत एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात सेबीने हे आरोप फेटाळून लावले असून या कर्मचाऱ्यांची बाह्य शक्तींकडून दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले आहे. सेबीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, या आरोपांद्वारे सेबीच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आता हे विधान मागे घेण्याची मागणी शेकडो कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

काय आहे प्रकरण?मिळालेल्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट 2024 रोजी सुमारे 500 SEBI कर्मचाऱ्यांनी वित्त मंत्रालयाला पत्र लिहून माधबी पुरी बुच यांच्यावर कार्यालयीन वातावरण बिघडवणे, कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे आणि अपशब्द वापरणे असे गंभीर आरोप केले होते. कार्यालयातील खराब वातावरणामुळे कर्मचारी नाराज असल्याचे पत्रात लिहिले आहे. वरिष्ठ अधिकारी प्रत्येक मुद्द्यावर ओरडून कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढतात आणि माधबी पुरी याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

दरम्यान, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आधी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी प्रकरणासंदर्भात सेबीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने सेबीवर आयसीआयसीआय बँकेकडून संचालक म्हणून पगार घेतल्याचा आरोप केला. मात्र, आयसीआयसीआय बँकेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता माधवी पुरी बुच यांना सेबी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :सेबीशेअर बाजारमुंबई