नवी दिल्ली : जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबांनी यांना वर्षाच्या सुरुवातीलाच काही मोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागले आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांची घसरण झाल्यानंतर आता सेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) एकूण ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सन २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने शेअर बाजारात कथित गडबड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सेबीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात 'आरआयएल'वर २५ कोटी आणि मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरआयएल आणि मुकेश अंबानी यांच्यासह नवी मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडला २० कोटी रुपये आणि मुंबई सेज प्रायव्हेट लिमिटेडला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण नोव्हेंबर २००७ मधील असून, शेअर बाजारातील रोख आणि वायदा बाजारातील खरेदी-विक्रीशी निगडीत आहे. मार्च २००७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये असलेला ४.१ टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सूचीबद्ध असलेल्या या कंपनीचे सन २००९ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले.
शेअर बाजारातील किमतीतील गडबडीमुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जातो. या कंपन्या बाजारात होणाऱ्या हेराफेरीला सर्वाधिक प्रभावित करत असतात. या कारणांमुळेच सेबीला अशा प्रकारच्या गडबडींवर बारीक लक्ष ठेवावे लागते, असे सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच वायदा आणि पर्यायी खंडच्या व्यवहारामागे आरआयएल आहे, याची सामान्य गुंतवणूकदारांना कल्पना नव्हती. फसवणुकीमुळे बाजारावर त्याचा अधिक परिणाम झाला. यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनाही मोठा फटका सहन करावा लागल्याचे सेबीकडून सांगण्यात आले.