Sebi On Adani : गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या अडचणी वाढताना दिसत आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या फेडरल कोर्टामध्ये प्रकल्पांसाठी लाचखोरीचे आरोप केल्यानंतर ते भारतात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भारतीय बाजारपेठेची नियामक सेबी आपल्या प्रकारे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करू शकते, अशी माहिती आता समोर आली आहे. ब्लूमबर्गनं सूत्रांच्या हवाल्यानं, अदानी समूहानं बाजारातील हालचालींची माहिती देण्यासाठी आवश्यक नियमांचं उल्लंघन केलं आहे का? याची सेबी चौकशी करू शकते, असं म्हटलं आहे.
काय आहे अधिक माहिती?
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड लाचखोरीच्या आरोपांबाबत अमेरिकेच्या न्याय विभागाच्या चौकशीचा योग्य खुलासा करण्यात अपयशी ठरली आहे का, अशी विचारणा इंडियन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डानं स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांना केली आहे. अदानी समूहानं खरोखरच योग्य ती माहिती दिली आहे का? अदानी समूह या प्रकरणात काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे का? असंही अधिकाऱ्यांना विचारण्यात आलंय. औपचारिक चौकशी सुरू करायची की नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी पुढील दोन आठवड्यांत या प्रकरणाची चौकशी करेल, असं सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं.
मागच्या वर्षी सर्च वॉरंट
एफबीआयच्या विशेष एजंट्सनं मार्च २०२३ मध्ये सागर अदानी यांच्या विरोधात सर्च वॉरंट जारी केले होते. त्यांना ग्रँड ज्युरी समन्सही बजावण्यात आलं होतं. अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आदेशात असं म्हटलं आहे.
काय आहेत आरोप?
भारतात सोलर एनर्जीचं कंत्राट मिळवण्यासाठी अदानी समूहानं सुमारे २१०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील वकिलांनी केला आहे. न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात गौतम अदानी, सागर अदानी आणि विनिता जैन यांचीही नावं आहेत.
आरोपांचं खंडन
आरोपांनंतर अदानी समूहाकडून एक निवेदन जारी करण्यात आलंय. अदानी ग्रीनच्या संचालकांवर अमेरिकेचे न्याय विभाग आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप निराधार असल्याचं समूहाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.