Join us

HDFC Bank ला सेबीकडून वॉर्निंग लेटर, बँकेवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:37 IST

HDFC Bank News : सेबीनं एचडीएफसी बँकेला एक वॉर्निंग लेटर पाठवलं आहे. यामध्ये बँकेवर नियमांच्या उल्लंघनाचे आरोप करण्यात आलेत.

HDFC Bank News : बाजार नियामक सेबीनं (SEBI) देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल प्रशासकीय अलर्ट जारी केला. एचडीएफसी बँकेनं गुरुवारी शेअर बाजाराला याबाबत माहिती दिली आहे. 'हे प्रकरण बँकेद्वारे इन्व्हेस्टमेंट बँकिंग इक्विटीजच्या आपल्या पीरिऑडिक इन्स्पेक्शनद्वारे केलेल्या निरीक्षणांशी संबंधित आहे, ज्यावर सेबीनं काही नियमांचं पालन करण्यात त्रुटी आढळल्यानं सेबीनं म्हटलं आहे,' असं एचडीएफसी बँकेनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय.

९ डिसेंबरला पाठवलं वॉर्निंग लेटर

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) जारी केलेल्या वॉर्निंग लेटरमध्ये 'सेबी (मर्चंट बँकर्स) नियम, १९९२, सेबी (कॅपिटल इश्यू अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१८ आणि सेबी (इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंधक) नियम, २०१५ मधील काही तरतुदींचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजीचं प्रशासनिक वॉर्निंग लेटर ११ डिसेंबर २०२४ रोजी बँकेला मिळालं. पत्रात व्यक्त करण्यात आलेल्या चिंता आणि सूचनांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असं बँकेनं म्हटलंय.

कामावर परिणाम होणार नाही

या पत्राचा बँकेच्या कामकाजावर किंवा अन्य कोणत्याही बाबींवर परिणाम होणार नसल्याची माहिती बँकेनं दिली. खासगी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या बँकेने सेबीच्या या इशारा पत्राची माहिती बीएसई आणि एनएसई दोन्ही एक्स्चेंजना दिली आहे. दरम्यान, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये गुरुवारी घसरण दिसून आली होती. एचडीएफसी बँकेचा शेअर गुरुवारी ४.७५ रुपयांनी (०.२५ टक्के) घसरून १८५८.९५ रुपयांवर बंद झाला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एचडीएफसीसेबी