नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून विविध क्षेत्रातील अनेकविधी कंपन्या एकामागून एक IPO सादर करत आहेत. मात्र, यातील काही बहुचर्चित आयपीओंनी गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली. चार ते पाच प्रतिष्ठित कंपन्यांचे आयपीओ फ्लॉप गेल्यामुळे गुंतवणूकदारांच्या लाखो कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजार नियामक सेबीने एक मोलाचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होऊ शकेल.
सेबीने दिलेल्या एका प्रस्तावानुसार, नवीन युगातील टेक कंपन्या, ज्या त्यांच्या समभागांची सूची तयार करण्यामध्ये व्यस्त आहेत, त्यांनी ऑफर दस्तऐवजात इश्यूच्या मूळ किमतीपर्यंत पोहोचण्याशी संबंधित प्रमुख कामगिरी निर्देशांकांचा खुलासा करावा. या सल्ल्याची अंमलबजावणी झाली, तर गुंतवणूकदारांचे हित जपले जाईल, असे सांगितले जात आहे.
सेबीने प्रस्तावावर मागवल्या सूचना
तोट्यात चालणार्या कंपन्यांच्या आयपीओसंबंधी खुलासा तरतुदींसाठी सल्ला देताना सेबीने म्हटले आहे की, या संदर्भात ५ मार्चपर्यंत टिप्पण्या आणि सूचना पाठवता येतील, असे सेबीने म्हटले आहे. तत्पूर्वी, नवीन टेक कंपन्यांनी पैसे उभारण्यासाठी गेल्या काही महिन्यांत आयपीओ आणण्याच्या संदर्भात सेबीने हे पाऊल उचलले आहे. यापैकी बर्याच कंपन्यांकडे इश्यूच्या आधीच्या तीन वर्षांतील ऑपरेटिंग नफ्याचा कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नव्हता. अशा कंपन्या सहसा दीर्घकाळ नफा कमावण्याच्या स्थितीत पोहोचत नाहीत. याचे कारण म्हणजे 'ना नफा ना तोटा' या स्थितीत पोहोचण्यापूर्वीच या कंपन्या सुरुवातीच्या वर्षांत नफा कमविण्यापेक्षा व्यवसाय वाढवण्यावर भर देतात.
दरम्यान, अत्यंत उत्साहाने अनेक कंपन्यांनी शेअर बाजारात आयपीओ सादर केले. मात्र, हजारो गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आली. यातील अनेक कंपन्यांनी आपली सुरुवात स्टार्टअप म्हणून केली होती. या कंपन्यांच फ्लॉप झालेले आयपीओंमुळे आता नवीन स्टार्टअपमधून बड्या झालेल्या कंपन्या आयपीओ सादर करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे. Zomato, Paytm यांसह ४ कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे १.३० लाख कोटी बुडल्याचे सांगितले जात आहे.