Join us

SEBIची मोठी कारवाई, शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याप्रकरणी १३५ संस्थांवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:43 PM

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं स्मॉल कॅप शेअर्सच्या किमतींमध्ये कथित फेरफार केल्याच्या विरोधात कठोर कारवाई केली.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) पाच स्मॉल कॅप शेअर्सच्या किमतींमध्ये कथित फेरफार केल्याच्या विरोधात कठोर कारवाई केली. सेबीनं या स्मॉलकॅप शेअर्समध्ये कथित फेरफार केल्याबद्दल १३५ संस्थांविरुद्ध अंतरिम आदेश पारित केले आहेत. त्यांना सिक्योरिटीज मार्केटमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच या संस्थांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

बाजार नियामक सेबीनं मौरया उद्योग लिमिटेड (Mauria Udyog Ltd), 7 एनआर रिटेल लिमिटेड (7NR Retail Ltd), दार्जिलिंग रोपवे कंपनी लिमिटेड (Darjeeling Ropeway Company Ltd), जीबीएल इंडस्ट्रीज लिमिटेड (GBL Industries Ltd) आणि विशाल फॅब्रिक्स लिमिटेड यांच्या शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे.

याशिवाय, नियामकानं प्रथमदर्शनी नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल २२६ संस्थांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या संस्थांनी पाच स्मॉलकॅप शेअर्सच्या किमतीत फेरफार करून १४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या संस्थांनी चुकीच्या मार्गानं कमावलेलं १२६ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेशही नियामकानं दिले आहेत. या संस्थांनी पूर्वनियोजित योजनेअंतर्गत सार्वजनिक गुंतवणूकदारांना 'बाय' रेकमेंडेशनसह मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवून शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार केल्याचं म्हटलं आहे.

सेबीकडून तपासया प्रकरणाच्या चौकशीसाठी सेबीनं अनेक पावले उचलली. सेबीनं अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या संस्था आणि मेसेज पाठवणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी डिजिटल फूटप्रिंट, बँकिंग व्यवहारांचा वापर केला.

मौरया उद्योग लिमिटेडच्या शेअर्समध्ये फेरफार करून तीन संस्थांना चुकीच्या पद्धतीनं फायदा मिळवून दिल्याचं निदर्शनास आल्याचं सेबीनं म्हटलं. तसंच विशाल फॅब्रिक्स प्रकरणी १४ संस्थांनी मिळून चुकीच्या पद्धतीनं ३१ कोटी रुपयांची कमाई केल्याचं सेबीच्या निदर्शनास आल्याचं सांगण्यात आलं.

टॅग्स :शेअर बाजारधोकेबाजी