SEBI New Rule: शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन (Market Capitalisation) मोजण्याची पद्धत बदलली आहे. शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या नियामक सेबी (SEBI) या संस्थेनं ही पद्धत बदलण्याचा निर्णय घेतलाय. नव्या निर्देशांनुसार लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आता गेल्या सहा महिन्यांच्या सरासरीवरून ठरवलं जाणार आहे. नव्या नियमांनुसार लिस्टेड कंपन्या आता एका दिवसाऐवजी मागील सहा महिन्यांच्या कालावधीतील 'सरासरी मार्केट कॅप' वापरतील.
लिस्टेड कंपनीचे मार्केट कॅप त्यांच्या शेअरच्या किमतीनुसार दररोज चढ-उतार करत असतं. अशा परिस्थितीत योग्य कालावधीतील सरासरी मार्केट कॅप डेटा त्या कंपनीचं बाजारमूल्य अचूकपणे दखवू शकेल, असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सेबीचे माजी पूर्णवेळ सदस्य एस. के. मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. ईज ऑफ डूईंगला प्रोत्साहन देण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. सेबीनं १७ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे हे बदल ३१ डिसेंबर २०२४ पासून लागू होतील.
३१ डिसेंबर ही कट ऑफ डेट
निर्देशांनुसार लिस्टेड कंपन्यांचं रँकिंग १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीतील सरासरी मार्केट कॅपच्या आधारे ठरविण्यात येणार असून ३१ डिसेंबर ही कट ऑफ डेट आहे. जेव्हा एखादी नवीन कंपनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होते, तेव्हा या तरतुदी कोणत्याही अंतरिम कालावधीनंतर किंवा ३१ डिसेंबरच्या (म्हणजे १ एप्रिल) तीन महिन्यांनंतर किंवा पुढील आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस, जे नंतर असेल, त्या दिवसापासून लागू होतील.
सलग ३ वर्षे एखाद्या कंपनीचं रँकिंग बदलल्यास नव्या तरतुदी त्या लिस्टेड कंपनीला लागू होणार नाहीत, त्यामुळे मार्केट कॅपमध्ये चढ-उतार अनुभवणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. लिस्टेड कंपनीचे मार्केट कॅप त्याच्या शेअरच्या किमतीनुसार दररोज चढ-उतार करत असते. अशा वेळी वाजवी कालावधीतील सरासरी मार्केट कॅप डेटा त्या कंपनीचे बाजारमूल्य अचूकपणे दर्शवेल, असा विश्वास शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.