नवी दिल्ली : बँकांचे अब्जावधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग लिमिटेड (यूबीएचएल) कंपनीची सर्व प्रकारची खाती जप्त करण्याचा आदेश सेबीने दिला आहे. बँक, शेअर (डीमॅट) आणि म्युच्युअल फंड (एमएफ) खात्यांचा त्यात समावेश आहे. १८.५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यासाठी हा आदेश सेबीने दिला आहे.
युनायटेड स्पिरीट या कंपनीमधील अनियमिततांबद्दल ‘यूबीएचएल’ला सेबीने २०१५ मध्ये १५ लाखांचा दंड ठोठावला होता. तथापि, कंपनीने हा दंड भरलाच नाही. थकीत दंडावर ३.५ लाखांचे व्याज झाले होते. याशिवाय वसुली खर्च म्हणून आणखी १ हजार रुपये कंपनीवर लावण्यात आले आहेत. सर्व मिळून १८.५ लाखांपेक्षा जास्त रक्कम यूबीएचएल कंपनीकडून सेबीला येणे होती.
या दंडाच्या वसुलीसाठी सेबीने यूबीएचएलविरोधात १३ नोव्हेंबर रोजी जप्तीची नोटीस पाठविली, जारी केली होती. कंपनीच्या बँक, अन्य जमाकर्ता तसेच म्युच्युअल फंड खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ नये, असे या नोटिसीत संबंधित संस्थांना बजावण्यात आले आहे. या खात्यांवर पैशांचा भरणा करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे. थकबाकीदार कंपनीची सर्व बँक खाती तसेच लॉकर्स जप्त करण्याच्या सूचनाही सेबीने दिल्या आहेत.
सेबीने म्हटले की, बँक खाती, शेअर्सची डीमॅट खाती तसेच म्युच्युअल फंडांची खाती यातून थकबाकीदार कंपनी मोठी रक्कम काढू शकते, असे मानण्यास सबळ कारण आहे. त्यामुळे या खात्यांवरून कोणतीही रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
डिसेंबर २०१६ मधील स्थितीनुसार, यूबीएचएल कंपनीत विजय मल्ल्या यांचे ७.९१ टक्के वैयक्तिक समभाग आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सर्व प्रवर्तकांच्या ताब्यात ५२.३४ टक्के समभाग आहेत. विजय मल्ल्या हे २ मार्च २०१६ रोजी भारतातून परागंदा झाले होते. तेव्हापासून ते ब्रिटनमध्ये आश्रयास आहेत.
विजय मल्ल्याच्या कंपनीची सर्व खाती सेबीकडून जप्त, १८.५ लाखांचा दंड : वसुलीसाठी कारवाई
बँकांचे अब्जावधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग लिमिटेड (यूबीएचएल) कंपनीची सर्व प्रकारची खाती जप्त करण्याचा आदेश सेबीने दिला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:32 AM2017-11-17T00:32:16+5:302017-11-17T00:32:41+5:30