नवी दिल्ली - योग गुरू बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या रुची सोयाविरोधात बाजार नियमाक सेबीने मोठी कारवाई केली आहे. रुची सोयाच्या एफपीओमध्ये गुंतवणुकीसाठी प्रेरित करण्यासाठी चुकीची पद्धत वापरण्यात आल्याने मार्केट रेग्युलेटरने गुंतवणूकदारांना आपली बोली मागे घेण्याची संधी दिली आहे. गुंतवणूकदार ३० मार्चपर्यंत आपली बोली मागे घेऊ शकतात. सेबी खूप कमी प्रकरणांमध्ये असा निर्णय घेते.
सेबीने तपासणीमध्ये पाहिले की, बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या ग्राहकांना रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४ हजार ३०० एफपीओमध्ये गुंतवणुकीसाठी काही मेसेज पाठवण्यात आले. ते विचारात घेऊन गुंतवणुकदारांना ही संधी देण्यात आली आहे.
ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले होते की, पतंजली कुटुंबातील सदस्यांसाठी खूशखबर आहे. पतंजली ग्रुपमधील कंपनी रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचा एफपीओ गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे. २८ मार्चला तो बंद होईल. हा एफपीओ ६१५ के ६५० रुपये प्रति शेअर दराने उपलब्ध आहे. बाजारभावापेक्षा ही किंमत ३० टक्क्यांनी कमी आहे. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमधून बँक/ब्रोकर/यूपीआयच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता.
सेबीने एफपीओच्या प्रमुख बँकर्सना सांगितले की, त्यांनी अशा एसएमएसबाबत गुंतवणुकदारांना खबरदार करत मंगळवार आणि बुधवारी वृत्तपत्रांमध्ये जाहीरात छापावी. रुची सोयाचा एफपीओ २८ मार्च रोजी बंद झाला होता. त्याचं सब्स्क्रिप्शन अपेक्षेपेक्षा कमी केवळ ३.६ पट एवढंच राहीलं.
गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असलेल्या भागामध्ये केवळ ८८ टक्के एवढीच बोली मिळाली. क्वालिफाईड इंस्टिट्युशन इन्व्हेस्टर्सचा भाग २.२ टक्के एवढा राहिला. सर्वाधिक ११.७५ पट अधिक बोली ही नॉन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्सच्या कोट्यामधून मिळाली.