Videocon Group: बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना बँक आणि डिमॅट खाती तसेच म्युच्युअल फंडातील ठेवी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. ५.१६ लाख रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी हा आदेश देण्यात आला आहे.
हा दंड सुप्रीम एनर्जीशी निगडीत काही हितसंबंधांसह काही देवणाघेवाणीसंदर्भात क्वालिटी टेक्नो अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेडेन्शिअल फायनॅन्स लिमिटेडसह असलेले संबंध उघड न केल्याबद्दल ठोठावण्यात आला आहे. धूत यांच्यावर ५.१६ लाख कोटी रुपयांचा दंड थकित असल्याचं सेबीनं नोटीसमध्ये म्हटलं आहे. यामध्ये ५ लाख रुपयांच्या दंडासह १५ हजार रुपये व्याज आणि १ हजार रुपये वसूलीचा खर्च समाविष्ट आहे.
थकबाकी वसूल करण्यासाठी, नियामकानं सर्व बँका, डिपॉझिटरीज- CDSL, NSDL आणि म्युच्युअल फंडांना धूत यांच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देऊ नये असं सांगितलं आहे. मात्र, ही रक्कम जमा करण्याची मुभा असेल. याशिवाय सेबीनं बँकांना लॉकर्ससह सर्व खाती संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
सेबीने मार्चमध्ये धूत यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड सुप्रीम एनर्जी प्रा. (एसईपीएल) कंपनीच्या वतीने कर्ज देताना त्यातील ९९.९ टक्के भागभांडवलाबद्दल (सुप्रीम एनर्जी) माहिती न दिल्याबद्दल ठोठावण्यात आला. याशिवाय धूत यांनी क्वालिटी टेक्नो अॅडव्हायझर्स प्रा. आणि क्रेडेन्शियल फायनान्स लि. मध्ये आपले हितसंबंधदेखील उघड केले नाहीत.
आणखीही कंपन्यांवर कारवाई
दरम्यान, गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे जमा केलेले पैसे वसूल करण्यासाठी सेबी २१ ऑगस्ट रोजी सनहेवन अॅग्रो इंडिया आणि रविकिरण रियल्टी इंडियासह सात कंपन्यांच्या १५ मालमत्तांचा लिलाव करणार आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार, इन्फोकेअर इन्फ्रा, भारत कृषी समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड, जीएसएचपी रियलटेक लिमिटेड, जस्ट-रिलायबल प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड आणि न्यूलँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या काही मालमत्तांचाही लिलाव होणार आहे.