Join us

निर्देशांकाच्या घसरणीचा सलग दुसरा सप्ताह

By admin | Published: August 11, 2014 2:06 AM

चलनवाढीचा दर स्थिर राखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक दर कायम ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणावामुळे मात्र निर्देशांकाला फटका बसला आहे

चलनवाढीचा दर स्थिर राखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक दर कायम ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणावामुळे मात्र निर्देशांकाला फटका बसला आहे. सप्ताहाच्या प्रारंभी आशादायक वातावरणात असलेला बाजार अखेरीस मात्र निराशाजनक अवस्थेत बंद झाला. सलग दुसऱ्या सप्ताहात बाजाराच्या निर्देशांकामध्ये घट झालेली दिसून आली.मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहाचा प्रारंभ उत्साहात झाला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणाच्या आढाव्यात बँक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेऊनही बाजाराने संयत प्रतिक्रिया दिली होती; मात्र सप्ताहाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावामुळे बाजार खाली आलेला बघायला मिळाला. जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण असलेले दिसून आले. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहभरात १५२ अंश म्हणजेच ०.६ टक्क्यांनी गटांगळी खाल्ली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २५३२९.१४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३४ अंश म्हणजेच ०.५ टक्क्यांनी घसरून ७५६९ अंशांवर बंद झाला. मिडकॅप तसेच स्मॉल कॅप या निर्देशांकामध्ये अनुक्रमे १.७ आणि ०.६ टक्क्यांनी घट झालेली दिसून आली. देशात असलेली चलनवाढ आणखी वाढू नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात सर्व दर कायम ठेवले. त्याचबरोबर बाजारातील रोखता कायम राहावी यासाठी एसएलआरमध्ये ५० अंशांची घट केली. बाजाराने या पतधोरणाचे चांगले स्वागत केलेले दिसून आले. सप्ताहाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणावाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. रशिया आणि युक्रेन या देशांमधील सुरू असलेला वाद आणखी चिघळला. त्याचबरोबर इराकमधील परिस्थितीही चिघळत असल्याचे निदर्शनास आले. इराकवर हवाई हल्ले चढविण्यात अमेरिकन अध्यक्षांनी मान्यता दिल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण पसरलेले दिसून आले. आंतरराष्ट्रीय तणावामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होताना दिसून आली. ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने घटलेले उत्पादन भरून काढण्याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने खनिज तेलाचे भाव वाढताना बघावे लागत आहेत. यामुळे आधीच मंदीत असलेल्या अर्थव्यवस्थांना आणखी फटका बसण्याची शक्यता वाढीला लागली आहे.खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही फटका बसणार आहे. यामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढणार असून चालू खात्यावरील तूटही वाढू शकते.