Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेकंड हँड दुचाकींची विक्री टॉप गीअरमध्ये!

सेकंड हँड दुचाकींची विक्री टॉप गीअरमध्ये!

नव्या गाड्यांइतकीत सेकंडहँड चारचाकी वाहनांची मागणी वाढत असतानाच आता, सेकंड हँड दुचाकी वाहनांच्या मागणीनेही जोर धरल्याची माहिती पुढे आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 03:09 AM2016-06-22T03:09:11+5:302016-06-22T03:09:11+5:30

नव्या गाड्यांइतकीत सेकंडहँड चारचाकी वाहनांची मागणी वाढत असतानाच आता, सेकंड हँड दुचाकी वाहनांच्या मागणीनेही जोर धरल्याची माहिती पुढे आली आहे.

Second-hand bikes sold in top gear! | सेकंड हँड दुचाकींची विक्री टॉप गीअरमध्ये!

सेकंड हँड दुचाकींची विक्री टॉप गीअरमध्ये!

मुंबई : नव्या गाड्यांइतकीत सेकंडहँड चारचाकी वाहनांची मागणी वाढत असतानाच आता, सेकंड हँड दुचाकी वाहनांच्या मागणीनेही जोर धरल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशात तब्बल ६० लाख ६० हजार सेकंडहँड वाहनांची विक्री झाली असून, हा गेल्या पाच वर्षांतील उच्चांक आहे. दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून येणारी नवी मॉडेल्स, याच कंपन्यांनी नव्या मॉडेलच्या विक्रीसाठी सुरू केलेल्या ‘बाय बॅक’ योजना, सुलभ वित्तसहाय्य यामुळे दुचाकी वाहनांच्या सेकंडहँड बाजारातही तेजी आली आहे.
दुचाकी वाहन कंपन्यांच्या असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात दुचाकी वाहनांच्या विक्रीने दशकभरातील उच्चांक गाठला असून, देशात तब्बल एक कोटी ६५ लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली. यापैकी तब्बल ४० टक्के विक्री ही सेकंडहँड बाजारात झाली आहे. देशात दुचाकी वाहनांच्या विक्री वेग झपाट्याने वाढत असून, गेल्या पाच वर्षांमध्ये दरवर्षी २० ते २२ टक्के इतका या बाजाराचा विकास झाला आहे. वाहनतज्ज्ञांच्या मते या ट्रेंडमध्ये आगामी काळात अशीच वाढ होताना दिसेल.
सेकंडहँड दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्यामागे बरीच कारणे आहेत. याची कारणमीमांसा करताना वाहन बाजाराचे अभ्यासक ग्रेसन परेरा म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून भारतीय बाजारात दुचाकी वाहनांचा ट्रेन्ड चांगलाच रुजला. भारतीयांच्या दुचाकी वाहनांकडून असलेल्या अपेक्षा म्हणजे, दमदार वाहन, मजबूत सस्पेन्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रति लिटर गाडीचा अ‍ॅव्हरेज. या सर्वच मुद्द्यांवर वाहन कंपन्यांनी काम केल्यामुळे याचा मोठा फायदा त्यांना विक्रीच्या रूपाने दिसत आहे.
एवढेच नव्हे तर, दुचाकी वाहनांच्या बाजारात झालेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, महिला, पुरुष, तरुण मुले, तरुण मुली असे भेद तसेच ग्राहक वास्तव्यास असलेल्या ठिकाणची भौगोलिक स्थिती आदी सर्व गोष्टी बघून वाहन कंपन्यांनी नवनवीन मॉडेल्स सादर केली आहेत. याचाही मोठा फायदा त्यांना वाढत्या विक्रीतून दिसून आला आहे.
भारतात लहान-मोठ्या अशा सुमारे १२ नामांकित दुचाकी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून, या कंपन्या वर्षाकाठी सरासरी २५ नवीन मॉडेल्स सादर करतात. विक्रीचा
वेग वाढविण्यासाठी वाहन कंपन्यांनी ज्याप्रमाणे ग्राहकांच्या कलाचा
विचार करत आपल्या धोरणात बदल केला. या कंपन्यांनी, नवीन मॉडेल्स सादर करताना त्याच्या प्रमोशन्ससाठी जुन्या वाहनांकरिता ‘बाय बॅक’ सारख्या योजना सुरू केल्या. अशा योजनांमुळे ग्राहकांना नव्या वाहनांसाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज भासली नाही. तसेच, दुसरा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे, चारचाकी वाहन कंपन्यांनी ज्याप्रमाणे स्वत:च पुढाकार घेत स्वत:ची ‘सेकंडहँड’ वाहनांची दुकाने सुरू केली, त्याच मॉडेलचा अवलंब दुचाकी वाहन कंपन्यांनीदेखील आता केला आहे. यामध्ये संबंधित वाहनाची आवश्यक दुरुस्ती व देखभाल करून ती वाहने विक्रीसाठी उपलब्ध केली जातात.
यामध्ये वाहनासाठी किमान दोन वर्षांची वॉरन्टीही दिली जाते आणि विशेष म्हणजे, या वाहनांसाठी सुलभतेने कर्जाची व्यवस्था देखील
या कंपन्यांतर्फे उपलब्ध करून दिली जाते. (प्रतिनिधी)

चारचाकी गाड्यांमध्ये ज्या प्रमाणे ‘स्पोर्टस् युटिलिटी व्हेअिकल’ (एसयूव्ही) हा
प्रकार तेजीत आहे,
त्याचप्रमाणे दुचाकीत
बुलेटला वाढती मागणी आहे.
अशा दणकट वाहनांची निर्मिर्ती करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत नवनवीन मॉडेल्स सादर केली असून, त्यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर केल्यामुळे ती वाहने चालविण्यात सुलभता आली आहे. परिणामी, वाहनप्रेमींचा कल त्या गाड्यांकडेही वाढताना दिसत आहे. विदाऊट गीअर वाहनांच्या खरेदीचा ट्रेन्ड
दुचाकी वाहन कंपन्यातर्फे होणाऱ्या विक्रीमध्ये विदाऊट गीअर वाहनांच्या खरेदीचे प्रमाणही लक्षणीय आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण विक्री होणाऱ्या वाहनांपैकी

30%
वाहने ही गीअरविना
अशी आहेत.

Web Title: Second-hand bikes sold in top gear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.