Join us

चंदा कोचरविरुद्ध दुसरी चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 4:05 AM

आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रबंध संचालक व सीईओ चंदा कोचर यांच्याविरुद्ध बँकेच्या संचालक मंडळाने आणखी एक चौकशी सुरू केली आहे.

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रबंध संचालक व सीईओ चंदा कोचर यांच्याविरुद्ध बँकेच्या संचालक मंडळाने आणखी एक चौकशी सुरू केली आहे. कोचर यांच्याविरुद्ध व्हिडिओकॉन समूहाशी त्यांचे साटेलोटे होते काय? यासंबंधीची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. एन. श्रीकृष्ण करीत आहेत.या दुसऱ्या चौकशीची जबाबदारी आयसीआयसीआय बँकेने पनाग अँड बाबू या कायदेतज्ज्ञ कंपनीकडे सोपविली आहे. न्या. श्रीकृष्ण यांच्याव्यतिरिक्त ही स्वतंत्र चौकशी होणार आहे. या चौकशीत कोचर यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात बँकेचा नफा १.३० अब्ज डॉलरने फुगवून दाखवल्याचा व त्यासाठी ३१ कंपन्यांचे बुडीत कर्जासाठी ताळेबंदात तरतूद करण्यास दिरंगाई केल्याचे आरोप आहेत.आयसीआयसीआय बँकेकडे एका जागरूक ग्राहकाने यासंबंधी तक्रार केल्याने बँकेने कोचर यांच्याविरुद्ध ही चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती बँकेतील सूत्रांनी दिली. कोचर यांच्याविरुद्ध ही तिसरी तक्रार आहे. बँकेने या तक्रारीची माहिती रिझर्व्ह बँकेला देऊन बाहेरील कायदेतज्ज्ञ कंपनी पनाग अँड बाबू यांची नेमणूक केल्याचे कळवले आहे, अशीही माहिती या सूत्रांनी दिली.>आठ वर्षात बँकेचा नफा १.३० अब्ज डॉलरने फुगवला, त्यासाठी ३१ बुडीत कर्जाच्या तरतुदीत दिरंगाई केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

टॅग्स :चंदा कोचर