लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यांमागून राज्ये लॉकडाऊनसदृश निर्बंध लावत असल्यामुळे व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता असून याचा सर्वाधिक फटका वाहन, किरकोळ विक्री (रिटेल) आणि लघु व मध्यम उद्योगांना (एमएसई)बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विश्लेषकांनी सांगितले की, हॉटेल, हवाई वाहतूक, ग्राहक वस्तू किरकोळ विक्री, प्रवास व पर्यटन, मल्टिप्लेक्सेस, वाहन, वित्त आणि काही निवडक ग्राहकाधिष्ठित क्षेत्रांना दुसऱ्या लाटेचा फटका बसणे अपेक्षित आहे. बीएनपी परिबास समूहातील भारतीय प्रतिभूती विभागाचे प्रमुख अमित शाह यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेचा ग्राहकांच्या प्रतिसादावरील परिणाम २०२० मधील परिणामांसारखाच असेल. मात्र त्याची तीव्रता तुलनेने कमी असेल. कारण यंदाचे लॉकडाऊन गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपेक्षा कमी कठोर आहे. याशिवाय आपण आता मुकाबल्यासाठी अधिक सुसज्जही आहोत. ग्राहक वस्तू, किरकोळ विक्री, प्रवास आणि पर्यटन यांसारख्या अधिक जोखमीच्या क्षेत्रांना तत्काळ फटका बसेल. शाह यांनी सांगितले की, जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या मागणीवर पुन्हा एकदा थेट परिणाम होईल. यात वाहन, वित्त आणि निवडक ग्राहक वस्तू क्षेत्रांचा समावेश आहे. आयटी, औषधी या क्षेत्रांच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे.
नोमुराच्या अहवालात म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेचा पहिल्या टप्प्यातील मागणीवरील परिणाम पहिल्या लाटेसारखाच असेल. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मागणीवरील परिणाम अधिक व्यापक असेल. या क्षेत्रातील सुधारणा लांबतील. गेल्या वर्षी लाट संपल्यानंतर साचून राहिलेली मागणी अचानक बाजारात प्रत्यक्षात आली आणि अनेक क्षेत्रांना लाभ झाला. यंदा अशा मागणीचे पाठबळ मिळण्याची शक्यता नाही.
दुचाकी विक्रीवर गंभीर परिणामn कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा दुचाकी वाहनांच्या विक्रीवर गंभीर परिणाम झाला आहे. एप्रिलमध्ये काही प्रमाणात सण - उत्सव असतानाही दुचाकी विक्री ३० ते ५० टक्क्यांनी घटताना दिसून येत आहे. n कोविड-१९च्या पहिल्या लाटेचा छोट्या शहरांवर परिणाम झाला नव्हता. दुसऱ्या लाटेचा मात्र छोट्या शहरांवरही परिणाम झाला आहे. १३ एप्रिल रोजी गुढीपाडवा झाला. त्यानंतर उपवासाच्या नवरात्रीही त्याच दिवसापासून सुरू झाल्या. या काळात दरवर्षी दुचाकी विक्री जोरात असते. यंदा मात्र बाजार सुस्त आहे. n गुढीपाडव्याला महाराष्ट्रात अपेक्षेच्या तुलनेत केवळ ५० टक्के विक्री झाली. उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांचाही फटका विक्रीला बसला. त्यातच कोविड-१९ साथीचा संसर्ग आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे मागणीत लगेचच सुधारणा होण्याची शक्यता नाही.